Thu, Jul 18, 2019 20:45होमपेज › Solapur › सोलापुरात तेलुगू सिनेमागृहे पडली ओस

सोलापुरात तेलुगू सिनेमागृहे पडली ओस

Published On: Dec 20 2017 1:47AM | Last Updated: Dec 19 2017 10:03PM

बुकमार्क करा

सोलापूर :  वेणुगोपाळ गाडी

एकेकाळी हाऊसफुल्ल चालणारी  सोलापुरातील सिनेमागृहे अलीकडे वाढती पायरसी, बेरोजगारी, लोकांचे स्थलांतर आदी कारणांमुळे ओस पडली आहेत. अशातच सिनेमागृहे  बंद न करण्याचा नियम आडवा येत असल्याने सिनेमागृहचालक चिंतीत आहेत.

सोलापुरात तेलुगू भाषकांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. तेलुगू संस्कृतीचे जतन करणारे मूळचे आंध्र-तेलंगणाचे व सध्या सोलापूरस्थित असणारे तेलुगूबांधव हे सिनेमावेडे आहेत हे सर्वश्रृत आहे. एकेकाळी एन.टी. रामाराव, ए. नागेश्‍वरराव, शोभनबाबू, मुरलीमोहन, कृष्णमराजू आणि तद्नंतरची पुढील पिढी समजल्या जाणार्‍या चिरंजीवी, बाळकृष्ण, नागार्जुन, व्यंकटेश आदी अभिनेत्यांचे सिनेमा सोलापुरात तुफान चालायचे. त्यावेळी चॅनल, पायरसी नावाचा प्रकार नव्हता. सिनेमागृहाबाहेर चाहते आपल्या आवडीच्या अभिनेत्यांचे कटआऊट लावून त्याला हारेतुरे घालून नवीन सिनेमाचे स्वागत करायचे. प्रचंड  प्रेक्षक संख्येमुळे ‘ब्लॅक’ने तिकिट विक्री व्हायची, पण अनेक स्थित्यंतरे येऊन सध्या तेलुगू सिनेमागृहे  प्रेक्षकांअभावी अडचणीत आली आहेत. 

टीव्ही चॅनल्सची रुजलेली संस्कृती, पायरसीचे वाढते प्रमाण, अँड्राईड मोबाईलवर डाऊनलोड वा कॉपी केलेले सिनेमे पाहण्याचे फुटलेले पेव आदींचा सिनेमागृह चालविण्याच्या धंद्यावर मोठा परिणाम झाल्याचे सिनेमागृहचालक सांगतात. नवीन सिनेमा ठराविक कालावधीसाठी दाखविण्याच्या दरातही अनेक पटींनी झालेली वाढ तसेच विडी घरकुलचा लाभ घेण्यासाठी गावठाण भागातून कुंभारीला स्थलांतरित झालेले तेलुगूबांधव कारणही सांगण्यात येते.  या विविध कारणांमुळे प्रेक्षकसंख्या 80 टक्क्यांनी घटल्याचा दावा सिनेमागृहचालक करीत आहेत. मॉर्निंग व नाईट शो चालविणे गेल्या काही वर्षांपासून बंद झाले असून केवळ तीनच दररोज चालत आहेत. चांगल्या सिनेमांमुळे सिनेमागृहे बर्‍यापैकी चालतात, पण एकंदर परिस्थिती बेताचीच आहे. जणू ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सिनेमागृहे चालत असल्याने चालकवर्गाला आगामी दिवस आणखीन कठीण येणार ही भीती सतावत आहे.