Sun, May 26, 2019 20:44होमपेज › Solapur › चहा विक्रेत्याच्या दोन मुली झाल्या डॉक्टर

चहा विक्रेत्याच्या दोन मुली झाल्या डॉक्टर

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 11:13PMकुर्डुवाडी : विनायक पाटील

दौंड व कुर्डुवाडी रेल्वेस्थानकावर चहा विकणारे अशोक होगले यांनी रात्रीचा दिवस करून, चहा विकून प्रसंगी जमीन विकून आपल्या दोन्ही मुलींना एम.डी. केले आहे.  आज डोनेशनच्या जमान्यात प्रतिकूल परिस्थितीतही या दोन्ही मुली  शासकीय महाविद्यालयातून एम.डी. म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसीन झाल्या आहेत. 

मोहिनी अशोक होगले यांचे दहावीपर्यंत शिक्षण नूतन विद्यालय कुर्डुवाडी येथे व बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण गावातच नगरपालिकेच्या महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयातून झाले.  बारावीमध्ये केंद्रात प्रथम क्रमांक आलेला होता. यानंतर एमबीबीएसचे शिक्षण मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अगदी मोफत झाले. 

त्यांचे पुढील एम.डी.चे शिक्षण रेडिऑलॉजिस्ट विषयात महात्मा गांधी शासकीय महाविद्यालय वर्धा येथे सुरू आहे. एम.डी.चे शिक्षण घेत असतानाच त्यांना आज दरमहा 80 हजार रुपयांचा स्टायफंड मिळत आहे हे विशेष. मोहिनीची लहान बहीण माधुरी हीसुध्दा प्रचंड हुशार होती.  माधुरीचे दहावीपर्यंत शिक्षण गावातच नूतन विद्यालयात झाले. ती केंद्रामध्ये प्रथम आली होती. दहावीला चांगले मार्क मिळाल्यामुळे तिला सहजच अकरावीला प्रवेश शाहू कॉलेज लातूर येथे मिळाला. मोठी बहीण वैद्यकीय शिक्षण घेत असल्यामुळे साहजिकच तिला वैद्यकीय शिक्षणाचे बाळकडू घरातच मिळत गेले.  बारावी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी झालेल्या एमबीबीएस निवड परीक्षेत धनगर समाजात महाराष्ट्रात पहिली आली. 

तिचे पुढील वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्रात नामांकित अशा मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये झाले.  एमबीबीएसच्या परीक्षेतही ती राज्यात तिसरी आली होती. एम.डी.साठी  घेण्यात आलेल्या परीक्षेत माधुरी ही राज्यात चौथी आल्याने तिला बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथे एमडीसाठी प्रवेश मिळाला आहे. 

आपल्या गुणवत्तेमुळे ती सध्या शासकीय ससून रुग्णालय पुणे येथील अतिदक्षता विभागाची मुख्य पर्यवेक्षक म्हणून काम करत आहे. शिक्षण घेत घेतच तिला दरमहा 80 हजार रुपयांचा स्टायफंड मिळतो आहे.  आज जरी या दोघींना दरमहा पैसे मिळत असले तरी पूर्वी एमबीबीएस शिक्षण घेताना मात्र आई-वडिलांची ससेहोलपट होत होती. अशोक होगले यांच्या पत्नी सुनीता यांनी मात्र मोठ्या धिराने आपल्या दोन मुलींना शिक्षण पूर्णपणे देण्याचा विडाच उचललेला होता.

धनगर समाजातील पहिली रेडिओलॉजिस्ट
 धनगर समाज हा मागास समाज म्हणून ओळखला जातो. या समाजात शिक्षणाचे प्रमाण आज वाढलेले आहे. अशोक होगले यांची मुलगी मोहिनी ही रेडिओलॉजिस्ट विषयात एम.डी. झालेली आहे. रेडिऑलॉजिस्ट विषयात एम.डी. होणारी ही धनगर समाजातील पहिलीच मुलगी आहे व दोघी बहिणी एम.डी. होण्याची धनगर समाजातील ही पहिलीच घटना आहे.