Sun, Aug 25, 2019 23:52होमपेज › Solapur › टँकर घोटाळ्याचे रजिस्टरच गायब!

टँकर घोटाळ्याचे रजिस्टरच गायब!

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 10:09PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या टँकर घोटाळ्याने वेगळेच वळण घेतले आहे. या घोटाळ्याबाबत सत्ताधारी नगरसेवक नागेश वल्याळ व संतोष भोसले यांनी आयुक्तांना दिलेल्या पुराव्यासंदर्भातील रजिस्टर भवानी पेठ पाणीगिरणीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. एवढेच नव्हे तर, या पाणीगिरणीचा कारभार रामभरोसे चालत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

शहरातील झोन क्र. दोनसह अन्य झोनमध्ये पाण्याच्या टँकरसंदर्भात अनियमितता असल्याचे पुराव्यासह नगरसेवक वल्याळ व भोसले यांनी उघडकीस आणले होते.  झोन व पाणीगिरणीतील रजिस्टर यामध्ये ताळमेळ नसल्याचे यातून स्पष्ट झाले होते. महापालिकेचे अधिकारी व मक्तेदार यांच्या संगनमतातून हा घोटाळा केेला जात असल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील पुराव्यांचे ‘गिफ्ट’ शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना देण्यात आल्यानंतर आयुक्तांकडून चौकशीची ग्वाही देण्यात आली होती.  रविवारी सकाळी नगरसेवक वल्याळ व भोसले यांनी भवानी पेठ पाणीगिरणीला भेट दिली असता, घोटाळ्याच्या पुराव्यासंदर्भातील ‘ते’ रजिस्टर गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  विशेष    म्हणजे, याठिकाणी टँकरसंदर्भात नोंद घेणारा कर्मचारीही हजर नसल्याचे आढळून आले. कर्मचार्‍याविनाच येथील पाणी टँकरमध्ये भरून नेण्याचा ‘रामभरोसे’ प्रकार सुरु होता. हे पाहून नगरसेवकद्वय अचंबित झाले. त्यांनी स्वत: कर्मचार्‍याची भूमिका बजावित टँकरच्या रजिस्टरमध्ये नोंदी केल्या.