Fri, Jul 19, 2019 18:33होमपेज › Solapur › मराठा कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या

मराठा कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या

Published On: Aug 13 2018 11:40PM | Last Updated: Aug 13 2018 11:25PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल. खोटे गुन्हे, गंभीर कलमे मागे घेण्यात यावीत अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे सर्व पक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी केली. विधानपरिषद सदस्य आ. प्रशांत परिचारक, आ. भारत भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, जि.प.सदस्य वसंतराव देशमुख, जि.प.सदस्या सौ. शैला गोडसे आदी या शिष्टमंडळात सहभागी होते. 

सकल मराठा क्रांती मार्चा आंदोलनातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्यामुळे समाजात भितीचे वातावरण तयार झाले आहे. आंदोलन व मोर्चात सहभागी झालेल्या इतरही समाजबांधवांना पोलिस स्टेशनला बोलावून चौकशी करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या मार्गाने आंदोलन संपन्न झाले. मात्र पोलिस कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने दाखल केलेल्या  गुन्हयातील गंभीर कलमे मागे घ्यावेत व खोटे गुन्हे दाखल करू नयेत, या मागणीसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे  या मागणीसाठी पंढरपूर येथेही आंदोलन करण्यात आले. दि. 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान तहसील कार्यालय पंढरपूर येथे शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर दि. 9 रोजी क्रांतिदिनी पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनही पार पडले. आंदोलनादरम्यान पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दोन तर तालुका पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना अटकही करण्यात आली आहे. तर अजून काही समाजबांधवांना  चौकशीनिमित्त  पोलिस ठाण्यात बोलावण्यात येत आहे. त्यामुळे समाजात भयभीत वातावरण तयार झालेले आहे.

आंदोलन शांतता व कायदा सुव्यवस्थेच्या मार्गाने सुरू असताना समाजबांधवांवर झालेल्या कारवाई मुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. म्हणून दाखल झालेल्या गुन्ह्यातील गंभीर कलम रद्द करण्यात यावी. तसेच यापुढील काळात सकल मराठा समाजबांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत अशी मागणी करणारे निवेदन यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी मोहन अनपट, सुधाकर कवडे, विनोद कदम, संदीप पाटील उपस्थित होते.