Sat, Mar 23, 2019 01:58होमपेज › Solapur › घटनाविरोधी वक्‍तव्य केल्याबद्दल संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी

घटनाविरोधी वक्‍तव्य केल्याबद्दल संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी

Published On: Jun 03 2018 7:11PM | Last Updated: Jun 03 2018 7:37PM पंढरपूर : प्रतिनिधी 

संभाजी भिडे यांनी अमरावती येथे देशाची राज्यघटना मान्य नसल्याचे आणि मनुस्मृतीचे समर्थन करणार केलेलं वक्‍तव्य दुर्दैवी असून पोलिसांनी भिडे यांचं ते वक्‍तव्य तपासून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

पंढरपूर येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी ना. आठवले बोलत होते. यावेळी पुढे बोलताना आठवले म्हणाले की, संभाजी भिडे यांचे नाव भीमा - कोरेगाव दंगली प्रकरणी 
चर्चेत आहे, त्यात त्यांचा सहभाग असेल तर कारवाई करावी, अशी आपण मागणी केलेली आहे. अमरावती येथे भिडे यांनी राज्यघटनेचा अवमान होईल असे वक्‍तव्य केले आहे तसेच धर्मनिरपेक्षतेविषयी त्यांनी चुकीचे वक्‍तव्य केले आहे. पोलिसांनी त्यांचे वक्‍तव्य कार्यक्रमाची ध्वनी चित्रफीत तपासून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत आठवले पुढे म्हणाले की, भीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ 3 जानेवारीच्या बंद मध्ये रिपाइंचाही संपूर्ण ताकदीनिशी सहभाग होता म्हणूनच तो बंद यशस्वी झाला.  या बंद दरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. लवकरच ही प्रक्रिया पार पडेल अशी अपेक्षा व्यक्‍त करून राज्यात मराठा आणि दलित असा वाद झाला नाही. ही समाधानाची बाब असून सामाजिक सलोखा वाढीस लागावा म्हणून रिपाइंने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले. 2011 साली देशातील जनगणना झाली असून त्यानुसार ओबीसीची लोकसंख्या किती आहे ते जाहीर करण्याची गरज आठवले यांनी व्यक्‍त केली. एवढेच नाही तर देशातील सगळ्या जातीच्या लोकांची जनगणना केली जावी आणि त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिले जावे. देशात मराठा, जाट, पाटीदार, पटेल याना आरक्षण दिले जावे,एस.सी.,एस. टी. ओ.बी.सी.च्या आरक्षणाला धक्‍का न लावता या समाजासाठी 25 टक्के आरक्षणाची तरतूद केली जावी अशीही सूचना आठवले यांनी यावेळी केली. शिवसेना भाजपसोबत नाही आली तरी रिपाइं मात्र भाजपसोबत असेल असे सांगत आठवले यांनी शिवसेनेनेही भाजसोबत आघाडी करावी अशी अपेक्षा व्यक्‍त करून भाजपने उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याची विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना केल्याचे सांगितले.  सेना, भाजप आघाडी होणे राज्याच्या हिताचे आहे. आगामी निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकच आघाडी होण्याची शक्यता दिसत नसल्याचेही यावेळी आठवले म्हणाले. 

मागासवर्गीय विद्यार्थींची शिष्यवृत्ती सध्या वर्षात एकवेळाच मिळत असून ती 2 किंवा 3 हफत्यात मिळावी अशी विद्यार्थ्यांची मागणी असून त्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी आठवले यांनी दिली. यावेळी रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, आबासाहेब दैठणकर, किर्तीपाल सर्वगोड, नगरसेवक महादेव भालेराव, दिपक चंदनशिवे यांच्यासह रिपाइंचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.