Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Solapur › समतेचे प्रतीक आषाढी सोहळा

ब्‍लॉग : समतेचे प्रतीक आषाढी सोहळा

Published On: Jul 22 2018 11:59PM | Last Updated: Jul 22 2018 11:59PMराजेंद्र ढवळे, पंढरपूर

शतकानुशतके गेली समाज बदलत गेला. परिवर्तन होत गेले. काळ बदलला. परंतु पांडुरांगच्या वाटेवरील-पंढरीच्या मार्गावरील दिंडीत अजूनही खंड पडलेला नाही. संतांनी नामभक्‍तीच्या जोरावर समाजात नवचैतन्य निर्माण केले. जातीभेद, वर्णभेद, पंथभेद ही पूर्वांपार चालत आलेली अनिष्ट बंधने वारकरी पंथांनी दूर केली. धर्माच्या नावाखाली स्वार्थी लोकांनी कर्मकांडाचा जो पसारा मांडला होता. तो वारकरी पंथानी हाणून पाडला. अंधश्रध्देच्या रूढीखाली दबलेल्या समाजाला विकासाचा-प्रकाशमय असा मार्ग या वारकरी पंथानी दिला. 

जोपर्यंत देहभाव आहे. तोपर्यंत दुर्गुण, द्वेष-दुजाभावही असणारच आहे आणि ही प्रापंचिक वृत्ती झाली. संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात-नामस्मरण केल्यास या प्रापंचिक वृत्तीत बदल होऊन सद्बुध्दी निर्माण होईल. हीच आपली सद्भक्‍ती होय. तिथे एकमेकांप्रती द्वेष, दुजाभाव रहात नाही. सद‍्गुणांचे संवर्धन होत राहते.  हीच वारकरी पंथाची फलश्रृती आहे. 
आई वडिलांचे सेवा हीच तिर्थटा होते. 

तुकाराम महाराज म्हणतात,

मायबाप केवळ काशी । 
तेणे न जावे तीर्थासी ॥
सर्व तीर्थाटन करीता । 
मायबाप नारायणा ॥

आई वडिलांच्या सवेलाच भक्‍तीसाधनेच विशाल स्वरूप म्हणून संबोधले आहे. भक्‍त पुंडलिकाने आई वडिलांच्या सवेला भक्‍ती मार्गात मोठे स्थान दिले आहे. 

हजारो मैल पायी चालत वारकरी पंढरीत येतात. पांडुरंगाशी नाते जोडले तर व्यक्‍ती आणि जाती ईश्‍वर रूपात मिळून जातात आणि त्या ठिकाणी खर्‍या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडते. वर्षानुवर्षे भागवत धर्माने हेच समतेचे दर्शन घडविले आहे. 

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । 
भेदाभेद भ्रम अमंगळ ।

या भूमिकेचाही तुकाराम महाराजांनी 17 व्या शतकात प्रसार केला. त्याचबरोबर समता व ऐक्यभाव प्रस्थापित केले. 

वारकर्‍यांची विठ्ठलभक्‍ती-विठ्ठलामध्ये रममाण होवून जाणारी त्यांची श्रध्दा ही विठ्ठलाच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. अशा वेळी स्वत: भगवान विठ्ठल स्वत:ला वारकर्‍यांमध्ये मिसळून गेल्याचा भास आषाढी एकादशीस होतो. 

जगाच्या हितप्रद जपणारी आपली संस्कृती भागवत धर्मामुळे अधिकच बळकत होत गेली. जीवनाचा खरा अर्थ वारीमुळे कळतो. वारकरी संप्रदायामध्ये पारमार्थिक साधन वारी आहे. आणि याच पारमार्थिक विचारामध्ये उच्च-निच्च, कनिष्ठ-श्रेष्ठ जाती भेदाला कोठेच थारा नाही. कुठल्याही कुळात जन्माला आला असला तरी एक लक्ष एक चित्त जर आपल्या लाडक्या विठ्ठलाशी बांधले असेल तर माणसा-माणसामध्ये भेद कसला?

पंढरीचे वारकरी हे खर्‍या अर्थाने मोक्षाचे अधिकारी आहेत, असे संत नामदेवांना वाटते. ऐहीक सुखासाठी, स्वार्थासाठी विठ्ठलाची पूजा करणे, उपसवास करणे संत तुकाराम महाराजांना आवडत नसत. खोटा उपवास, व्रते, यज्ञे, तिर्थ यात्रा, कर्मट अनुष्ठान इ. त्रासदायक कर्मकांडापासून तुकाराम महाराजांनी लोकांना मुक्‍त केले आणि स्वत:च्या सद्सद्विवेकबुध्दीवर आधारलेल्या भक्‍तीमार्गाचा एक सरळ असा सोपा धर्म लोकधर्म तुकाराम महाराजांनी दाखवून दिला. 

भागवत धर्मातील समतेची पताका ही नितीमूल्यांपर्यंत जाऊन माणसाला माणुसकीत जोडण्याचं काम करते. आपण सर्व ईश्‍वराची लेकरे आहोत. त्यामुळे आपण एकमेकांशी चांगले वागले पाहिजे. नितीमान राहिले पाहिजे. हेच वारकरी पंथाचे उद्दिष्ट आहे. 

एकमेकांबद्दल प्रेम, मैत्री, सदाचार हाच श्री विठ्ठलापर्यंत पोहचण्याचा मार्ग आहे. सर्व मानव जातीच्या  हितासाठी माणसाने नितीमान झाले पाहिजे. माणसांवर प्रेम केले पाहिजे. 
तरच खर्‍या अर्थाने आपले जीवन सार्थक होईल. वारकरी पंथ हा संस्कार आणि जाणीव निर्माण करतो. 

मनुष्याच्या जन्माबरोबर जाणीव निर्माण होते आणि पुढे तो संस्काराबरोबर बांधला जातो. हे सर्व मानले की आत्मा, कर्मकांड नाहीसा होता. तो वारकरी पंथ. 

नाम: स्मरणासारखे सोपे साधने त्रिभुवनात नाही. नाम ही साधकांची संजीवनी आहे. नामाने भक्‍तिभाव वाढतो. नाम हे साराचे सार आहे व भक्‍तीचे भांडार आहे. दया, क्षमा, शांती हेच खरे अलंकार आहेत, असे संत नामदेव म्हणतात. 

पंढरीमध्ये येणार्‍या प्रत्येक वारकर्‍याला संतांच्या माणुसकीची शिकवण जपायची आहे. माणुसकीचा हा खरा धर्म भक्‍तांनी पाळून गरीबांना सहाय्य केले तर हीच खरी श्री विठ्ठलाची महापूजा घडेल.