Tue, Apr 23, 2019 20:08होमपेज › Solapur › नवीन जलतरण तलावाला लागली घरघर

नवीन जलतरण तलावाला लागली घरघर

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 8:18PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

विजापूर रोडवरील सुंदरमनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाला पाच महिन्यांतच जणू घरघर लागली आहे. तलावातील टाईल्स फुटल्याने तसेच फिल्टरेशन पाईप गळत असल्याने हा तलाव बंद अवस्थेत आहे. हा जलतरण तलाव महापालिकेने चालवावा याबाबत  जिल्हा क्रीडासंकुलाने महापालिकेला तसा प्रस्ताव दिला असला तरी महापालिकेने अद्याप याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे हा तलाव कधी सुरु होणार, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

जिल्हाधिकारी क्रीडा समितीचे अध्यक्ष

जिल्हा क्रीडासंकुल समितीकडून या तलावाचे व्यवस्थापन केले जाते. या तलावाची पाणी साठवण क्षमता 40 लाख लिटर असून तीन दिवसांतून 50 हजार लिटर वाया पाणी इतरत्र सोडले जाते. या समितीचे अध्यक्ष  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तर व्यवस्थापक म्हणून नीलकंठ शेटे काम पाहतात.

पाच महिन्यांतच लागली घरघर

जिल्हा क्रीडासंकुलातर्फे विजापूर रोडवरील सुंदरमनगर येथे अद्ययावत स्वरुपाचा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धा होण्याच्याद‍ृष्टीने या तलावात सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. एप्रिल महिन्यात सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत या तलावाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. 

हा तलाव सुरु होताच जलतरणप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या तलावात पोहण्यासाठी तरुण- तरुणींसह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत होती. यातून क्रीडासंकुल समितीला उत्पन्न प्राप्त होत होते. चांगला प्रतिसाद मिळूनही जिल्हा क्रीडासंकुल समिती हा जलतरण तलाव चालवण्यात अपयशी ठरली  आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

तलावातील टाईल्स फुटल्या

या तलावात उच्च दर्जाच्या टाईल्स बसवण्यात आल्याचा दावा क्रीडासंकुलातर्फे करण्यात आला होता. मात्र पाच महिन्यांतच या टाईल्स कशा फुटल्या, असा सवाल आहे. शिवाय पाण्याच्या फिल्टरेशन पाईपला गळती लागल्याने पाणी शुद्धीकरण प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे हा तलाव मागील दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे.

नियोजनाचा बोजवारा

तलाव सुरू होऊन काही महिने उलटताच हा तलाव वादात सापडला आहे. तलावाचे वाया जाणारे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरांसमोर साचून तेथे प्रचंड चिखल व दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे या परिसरातील रहिवासी संतप्त झाले होते. त्यांनी याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र  तलाव व्यवस्थापनाने मात्र याबाबत हात वर केले आहेत. 

पाणी निचर्‍याचे ढिसाळ नियोजन या तलावातील पाणी दर चार दिवसाला बदलण्यात येते. मात्र जलतरण तलाव बांधताना तलावातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणार्‍या दूषित पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा ठेकेदाराकडून तयार करण्यात आली. 

महालक्ष्मीनगर परिसरात असलेल्या महापालिकेच्या जुन्या ड्रेनेजमध्येच हे वाया जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जाते. त्यामुळे जुन्या ड्रेनेजलाईनवर ताण येऊन ही लाईन जमिनीतच फुटली आहे. पाण्याच्या प्रेशरमुळे या परिसरातील अनेक घरांत ड्रेनेजचे पाणी रिव्हर्स होऊन शिरत आहे. ड्रेनेजमधील किडे, अळ्या अनेकांच्या घरात शिरत असल्याचे प्रकार येथे अनेकदा घडले आहेत.

आ. प्रणिती शिंदे आक्रमक

अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा क्रीडासंकुलातर्फे हा जलतरण तलाव सुरु करण्यात आला होता. मात्र काही महिन्यांतच हा तलाव बंद पडल्याने हा तलाव तातडीने सुरु करावा, अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.