Tue, Feb 19, 2019 08:02होमपेज › Solapur › शरद प्रतिष्ठानने केली सरकारच्या आदेशांची होळी

शरद प्रतिष्ठानने केली सरकारच्या आदेशांची होळी

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 03 2018 9:09PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाचे आश्‍वासन बासनात, धनगर आरक्षणाबाबत चालढकल, शेतकर्‍यांची फसवी कर्जमाफी, शाळा बंद करुन गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण आणि जी.एस.टी.सारख्या जाचक प्रणालीमुळे थंडावलेला व्यापार, व्यवसाय यामुळे राज्यात या सरकारविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. त्यामुळे आज आम्ही या अन्यायी सरकारची प्रतिकात्मक होळी करुन शासनाविरोधात बोंब ठोकून शासनास जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती शरद प्रतिष्ठानचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे यांनी दिली आहे. गुरसाळे-टेंभुर्णी रस्ता, ता. पंढरपूर येथे होळी सण अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला असून शासनाच्यावतीने सातत्याने अन्यायी धोरणे राबविण्यात येत आहेत. या धोरणांच्या निषेधार्थ वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करुनदेखील शासनास जाग येत नसल्याने आज येथील ग्रामस्थ व शरद प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांच्या प्रतींची, प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करण्याबरोबरच शासनाविरोधात बोंब ठोकल्याचे दिसून आले.

 यावेळी बालाजी खंदारे, पोपट चव्हाण, सोमा ढवण, नाना खरतडे, सोमा जाधव, दीपक कवडे, राहुल पवार, सुखदेव भोसले, बालाजी पवार, दीपक माने, प्रशांत पवार, नवा वाघमारे, शिवाजी चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित 
होते.