Wed, Jul 24, 2019 12:35होमपेज › Solapur › पावसाची संततधार 

पावसाची संततधार 

Published On: Jul 17 2018 1:47AM | Last Updated: Jul 17 2018 1:46AMसोलापूर : प्रतिनिधी  

सोलापूर शहर व जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी दिवसभरात 9.41 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून खरिपासाठी आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्‍त केले जात आहे.रविवारी सायंकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने सोमवारी सकाळी चाकरमान्यांची मोठी तारांबळ झाली. सकाळी शाळा-महाविद्यालयांना जाणार्‍या विद्यार्थ्यांसह 

नोकरवर्गालाही याचा फटका बसला. त्यामुळे अनेकांना छत्र्या आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे लागले. पावसाचा जोर नसला तरी संततधार कायम सुरू होती. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता.  सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शनच झाले नाही. शहरातील अनेक सखल भागात पाणी थांबले होते. त्यामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत झाले होते. सध्या पुनर्वसू नक्षत्र सुरू आहे. त्यामुळे या नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडतो, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. त्यानुसार सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात खरिपासाठी हा पाऊस लाभदायक असून आतापर्यंत जिल्ह्यात 26 टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे झालेल्या खरिपाला आणि उर्वरित पेरण्यासाठीही या पावसाची मोठी मदत होणार आहे. पावसाचा जोर नसला तरी सातत्याने हलका पाऊस पडत असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान न करताना शेतकर्‍यांना मदत होईल, अशी हजेरी पावसाने लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत या पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली असून यामध्ये उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, माढा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांत जवळपास चांगला पाऊस झाला आहे.