Fri, Apr 26, 2019 19:18होमपेज › Solapur › परिचारकांच्या निलंबन प्रकरणी: पंढरपुरात महसूल मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

परिचारकांच्या निलंबन प्रकरणी: पंढरपुरात महसूल मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

Published On: Mar 01 2018 8:44PM | Last Updated: Mar 01 2018 8:54PMपंढरपूर : प्रतिनिधी

विधान परिषदेतील भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेतल्याचा निषेध म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पंढरपुरात माजी सैनिक संघटना, शेतकरी संघटना, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, काँग्रेसबरोबरच इतर सामाजिक संघटनाच्यावतीने निषेध व्‍यक्‍त करण्यात आला.

सैनिकांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या परिचारकांचे निलंबन बुधवारी मागे घेण्यात आले. समितीच्या या निर्णयाचा निषेध म्हणून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिक संघटनेसह शिवसेना, शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायं सातच्या सुमारास एकत्र येऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच या निर्णयाची घोषणा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याची मागणी केली. भाजप सरकारला महिलांच्या सन्मानाशी काही देणे, घेणे नाही, देशाच्या सैनिकांचा अवमान करणाऱ्यास हे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप केण्डळे यांनी आठ दिवसात हा निर्णय मागे नाही घेतल्यास तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, काँग्रेसचे शंकर सुरवसे, माजी सैनिक संघटनेचे मेजर नागतीळक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, सुमीत शिंदे, सागर कदम, समीर कोळी, संदीप पाटील, जगदीश यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.