होमपेज › Solapur › अघोषित संप करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना महामंडळाचा झटका

सोलापुरात ६, लातूर ४४, उस्मानाबादेत १९ बडतर्फ!

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 20 2018 10:52PMसोलापूर/लातूर : प्रतिनिधी

राज्यात 8 व 9 जून रोजी अघोषित संप पुकारणार्‍या कर्मचार्‍यांना एसटी महामंडळाने चांगलाच दणका दिला असून राज्यभरातील 1048 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. त्यात सोलापूर विभागातील सहा, तर लातूर आगारातील 44 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. उस्मानाबाद आगारातील 19 कर्मचारीदेखील बडतर्फ करण्यात आले आहेत. अचानक पुकारलेल्या संपामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केल्याचा ठपका या कर्मचार्‍यांवर ठेवण्यात आला आहे.

 या कारवाईत एक वर्षापूर्वी भरती झालेल्या नवीन कर्मचार्‍यांचादेखील समावेश आहे. या कारवाईविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना न्यायालयात जाणार असल्याची माहिती संघटनेचे नेते संदीप शिंदे यांनी दिली आहे.

सोलापूर विभागातील बार्शी आगार व सोलापूर आगारामधील यांत्रिक विभागात काम करणार्‍या सहाय्यक (कनिष्ठ) एसटी कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली असून यामध्ये दिलीप साळुंखे (सहायक, सोलापूर  आगार), परमेश्‍वर भालेराव (सहाय्यक, सोलापूर आगार), राकेश कुंभारे (सहाय्यक, सोलापूर आगार), प्रवीण भारत गायकवाड (सहायक, बार्शी आगार), सिध्देश्‍वर लक्ष्मण जाधव (सहायक, बार्शी आगार), आकाश चंद्रसेन जगताप (बार्शी आगार) यांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी संपाचा अहवाल पाठविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे लातूर आगारातील 44 कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली असून त्याचे आगारनिहाय आकडे असे आहेत. लातूर 25, उदगीर 03, अहमदपूर 05, निलंगा 06, औसा 02, लातूर कार्यशाळा 03, तर उस्मानाबाद आगारातील 19 कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. 

9 जून रोजी राज्यातील 1 हजार 588 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते, तर 68 कर्मचार्‍यांना  बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी संघटनेची बैठक घेतली होती. वेतनवाढ झाल्याची घोषणा झाल्यानंतर कर्मचार्‍यांनी अघोषित संप मागे घेतला होता. संपानंतर एसटी महामंडळाने ही बडतर्फची सर्वात मोठी कारवाई केली. उर्वरित कर्मचार्‍यांवरही कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे कर्मचार्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या कारवाईविरोधात काही संघटना न्यायालयात धाव घेणार आहेत.

लातुरात कामगार संघटनेची निर्दशने

बुधवारी लातूरच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी निर्दशने करून ही कार्यवाही मागे घेण्याची मागणी केली. ही कार्यवाही एकतर्फी व अन्यायकारक आहे. घटनेच्या चौकटीत ती बसणारी नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ ती मागे घ्यावी. नाही तर होणार्‍या परिणामाला प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल. या कारवाईबद्दल कामगारांत प्रचंड असंतोष असून कारवाई मागे घेण्यासाठी आम्ही प्रशासनाला दोन दिवसांचा अवधी दिला आहे. यावर अंमलबाजवणी न झाल्यास 23 जून रोजी मुंबई येथे होणार्‍या संघटनेच्या बैठकीत पुढील दिशा ठरेल. एक तर न्यायालयात जाऊ, नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव सूर्यकांत नादरगे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिला.