होमपेज › Solapur › म्हैसाळच्या पाण्यासाठी झगडावे लागेल  

म्हैसाळच्या पाण्यासाठी झगडावे लागेल  

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 11:41PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

मंगळवेढ्याचे प्रतिनिधित्व करताना गृहमंत्री म्हणून राज्यपालांकडे गेलो. खासबाब म्हणून सिंचन योजना मंजूर केली. एनटीपीसीचे पाणी हे उद्योगाला आहे. एका जिल्ह्याला विद्यापीठ आणले. आम्ही चलाख आहोत, पण पाणी आणण्यात प्रयत्न कमी पडलेे. नीती नसणारांनी आयोग स्थापला आहे. पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. म्हैसाळच्या लाभदायी उर्वरित गावांना पाण्यासाठी झगडावे लागेल. यात मी कुठेही असो, तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. 

मंगळवेढा येथे आयोजित रौप्य महोत्सवी पाणी परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  पाणी परिषद कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. गणपतराव देशमुख,  आ. भारत भालके, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मा.आ. शरद पाटील, वैभव नायकवडी, कल्याणराव काळे, पाणी परिषद संघर्ष समिती मंगळवेढा अध्यक्ष शिवाजी काळुंगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, निमंत्रक अ‍ॅड. भारत पवार, प्रा. बाबुराव गुरव, चेतन नरोटे, बाळासाहेब बागवान, चंद्रकांत देशमुख, विश्‍वनाथ चाकोते, बिराप्पा जाधव , राहुल शहा, बाळासाहेब नायकवाडी , नगराध्यक्षा अरुणा माळी, सांगोल्याच्या नगराध्यक्षा राणीताई माने, बी. एस. माने, अ़ॅड. सुजीत कदम आदींसह पाणी परिषदेचे  कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीस स्व. नागनाथ आण्णा नायकवाडी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात बाळासाहेब नायकवाडी यांनी पाणी संघर्ष चळवळ कशी उभा राहिली याचा इतिहास मांडला.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, आ. भारत भालके यांच्यासोबत अनेकदा दिल्ली आणि मुंबई मध्ये गेलो आहे.  गावांना पाणी मिळवल्या शिवाय थांबणार नाही. सध्या माझा कोणताच मतदार संघ नाही. न बोलवता सुध्दा मी आलोच असतो. असे सांगत पराभवाचे शल्य बोलण्यातून शिंदे यांनी व्यक्‍त केले. मात्र उद्याच्या पिढी साठी संघर्षास तयार असल्याचे सांगितले.

आ. गणपतराव देशमुख म्हणाले की, संताच्या भूमीत ही परिषद अतिशय यशस्वी केली. याचे श्रेय तालुक्यातील शेतकर्‍यांना आहे. ए. आय. बी. पी. योजना सरकारने बंद केली. आता सरकारने नवीन योजना आणली. कृष्णा खोरे महामंडळ आणि राज्य सरकारच्या लोकांना म्हैसाळ योजनेला निधी द्यावा असे सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. महिनाभर वाट पाहीन. नाहीतर जत, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील आमदार आणि लोकांसोबत मी चळवळ उभा करेन. असा इशारा त्यांनी या परिषदेत राज्य सरकारला दिला. व तरुणांनी पुढे येत ही चळवळ हाती घ्यावी. शेवटच्या गावाला पाणी मिळेपर्यंत ही चळवळ थांबवू नये असे आवाहन आ. देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात केले .

आ. भारत भालके म्हणाले की, पाणी कुणाच्या मालकीचे नाही. सगळ्यांचा हक्क आहे. ही चळवळ धगधगती ठेवली म्हणून न्याय मिळत गेला. टेलकडून हेड पाणी मिळाले पाहिजे.  आ. गणपतराव देशमुख यांच्या साक्षीने  गावच्या योजनेला खासबाब मंजुरी आणली. योजनेला पैसे मिळावेत हा ठराव परिषदेत केला. म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून कृतज्ञ आहे. विधिमंडळात गणपतराव देशमुख यांना कुणीही विरोध करत नाही. आम्ही तिथे ताकतीने आपल्याला पाठिंबा देणार आहोत. उजनी धरणाला पुनर्वसनात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पाणी द्यावेच लागेल. मी आणि आ. गणपतराव देशमुख विधानसभेत आक्रमक होणार असल्याचे सांगीतले.

यावेळी जि.प.सदस्य शैला गोडसे, कल्याणराव काळे, प्रा. शरद पाटील,प्र. शिवाजीराव काळुंगे, आर. एस. चोपडे, चंद्रकांत देशमुख, बाळासाहेब बागवान, अ‍ॅड. भारत पवार, प्रा. बाबुराव गुरव यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन इंद्रजीत घुले यांनी केले. या पाणी परिषदेसाठी मंगळवेढा, सांगोला, आटपाडी, जत, वाळवा, पंढरपूर, मोहोळ भागातून हजारोंच्या संख्यने शेतकरी उपस्थित राहिले होते. ही पाणी परिषद चार तास चालली.