Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Solapur › कायद्याची अंमलबजावणी करणारेच अंधश्रद्धेच्या छायेत 

कायद्याची अंमलबजावणी करणारेच अंधश्रद्धेच्या छायेत 

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 10:55PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

संसदेत कायदे तयार होतात, त्याची खालपर्यंत शेवटच्या तळापर्यंत अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस प्रशासन करते. त्यानुसारच अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आला. मात्र  या कायद्याची अंमलबजावणी करणारेच अंधश्रद्धेच्या छायेत गुरफटल्याचे दिसून येत आहेत. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा अंमलात यावा यासाठी सुमारे 16 वर्षे संघर्ष केला. त्यांच्या मागणीनुसार सरकारने विधेयक तयार केले आणि ते विधेयक विधिमंडळात मंजुरीसाठी मांडण्यात आले. पण तेथे  14 वर्षे अडकले होते. जेव्हा नरेंद्र दाभोळकर यांची अत्यंत अमानुषपणे हत्या झाली  त्याच्या दुसर्‍या दिवशी घाईघाईने सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा वटहुकूम काढून अंमलात आणला. मूळ विधेयकाचे नामकरण अंधश्रद्धाऐवजी जादूटोणाविरोधी असे करुन 13 डिसेंबर 2013 रोजी विधानसभेत तर 18 डिसेंबर 2013 रोजी विधान परिषदेत हा अध्यादेश पास होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले.  अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र  हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. 

त्याच जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमानुसार मंत्र-तंत्र, गंडे-दोरे आणि बाहुल्या प्रवेशद्वारावर  बांधणे म्हणजे अंधश्रद्धा अर्थात जादूटोणाविरोधी कायद्यात मोडते. काहीजण स्वातंत्र्य अभिव्यक्‍ती असल्याने घरावर, खासगी कार्यालयावर बांधतात. याच बाहुल्या, गंडे-दोर्‍यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. 

मात्र कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम करणार्‍या पोलिस प्रशासनात अशा वृत्तीचा शिरकाव होणे म्हणजे चुकीचे म्हणावे लागेल. सोलापूर पोलिस अधीक्षक कार्यालयातील पाठीमागील बाजूस नव्याने नूतनीकरण करुन बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर बाहुली बांधण्यात आली आहे. या सभागृहात प्रवेश करताना अनेकांना खटकले. मात्र याच प्रवेशद्वारातून अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रवेश केला आहे. त्यापैकी एकाही वरिष्ठ अधिकार्‍याला ही बांधण्यात आलेली बाहुली खटकली  नाही हे विशेष. देशात बुवा आणि बाबांचे पेव  चांगलेच फुटले आहे. समाज अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकला आहे. सर्वसामान्य नव्हे तर वैज्ञानिकदेखील अंधश्रद्धा बाळगतात. काही वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रज्ञांनी अवकाशात यान प्रक्षेपित केले होते. त्यावेळी कोणताही अडथळा  येवू नये, यासाठी मुहूर्त बघून लिंबू मिरची बांधून यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते, अशी खंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिकचे कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी एका कार्यक्रमात व्यक्‍त केली होती. सोलापूर पोलिस अधीक्षक कार्यालयातील हा प्रकारही असाच आहे. 

जिल्ह्यात झाले दोन प्रशिक्षणे 
जादूटोणा विरोधी कायद्याविषयी अधिक प्रशिक्षण देण्यासाठी शाम मानव हे राज्यभर पोलिसांना प्रशिक्षण देत आहेत. ते  जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार, प्रसार कार्यक्रम  अंमलबजावणी समितीवर असून त्यादृष्टीने राज्यभर जाहीर व्याख्याने देत आहेत. तसेच शासनाच्या पीआयएमसी (प्रोग्राम इंम्पलेमेंशन अँड मॉनिटोरलिंग कमिटी) च्या सहअध्यक्षपदी आहेत. त्यानुसार त्यांनी 35 जिल्ह्यात वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणा विरोधी कायदा चमत्कार प्रात्यक्षिकांसह अनेक प्रशिक्षण देवून पोलिसांना जादूटोणाविरोधी कायद्याविषयी, अंधश्रद्धा उच्चाटनाविषयी व्याख्याने देवून प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण दिले. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातही  2016 साली सोलापूर जिल्ह्यात पोलिसांमध्ये जनजागृती करण्यासाठी दोन प्रशिक्षण कार्यक्रम झाल्याचे शाम मानव यांनी सांगितले.