Sun, Sep 23, 2018 13:58



होमपेज › Solapur › उजनीतून उन्हाळी हंगामाचे दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय 

उजनीतून उन्हाळी हंगामाचे दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय 

Published On: Mar 08 2018 7:53PM | Last Updated: Mar 08 2018 7:53PM



बोंडले : विजयकुमार देशमुख 

उजनीतून धरणामधून उन्हाळी हंगामाचे दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्‍या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उजनी धरणामधून उन्हाळी हंगामात सिंचनासाठी प्रस्तावित पाणी नियोजन करण्यासाठी मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. प्रणिती शिंदे, आ. हणुमंतराव डोळस, आ.सिध्दराम म्हेत्रे. आ. नारायण पाटील, इंदापुरचे आ.दत्तात्रय भरणे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, समाधान अवताडे, अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगुले आदी या बैठकीस उपस्थित  होते. 

या बैठकीमध्ये उन्हाळी हंगामासाठी कालव्यातून प्रस्तावित दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून, कालवा पहिले सिंचन आवर्तन (माण नदी गुंजेगाव बंधार्‍याचे खाली सरकोली बंधार्‍यापर्यंत व सीना नदी अर्जुनसोंड ते कुंडलसंगम पर्यंत) १५ मार्च पासून सोडले जाणार आहे. यासाठी ७.२५ टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडले जाणार आहे. तर दुसऱ्या आवर्तनासाठी कालव्यातून  ७.६० टीएमसी पाणी २० मे नंतर सिंचनासाठी सोडले जाणार आहे. तसेच भीमा सीना जोड कालवा पहिले आवर्तन (शिराळा, बार्शी व शिरापूर उपसा सिंचन  योजनेसह) १.४०  टीएमसी पाणी ९ मार्च पासून सोडले जाणार आहे. तर दुसरे आवर्तन (आकस्मित आरक्षणापैकी) १.२५ टीएमसी पाणी भीमा नदी व कालव्याच्या दुसर्‍या आवर्तनापूर्वी सोडले जाणार आहे. 

याचबरोबर सीना माढा उपसा सिंचन योजनेमधून पहिले आवर्तनात ०.८० टीएमसी व दुसरे आवर्तनात ०.८० टीएमसी. आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी पहिले आवर्तनात ०.२५ टीएमसी व दुसरे आवर्तन ०.२० टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.  तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी पहिले आवर्तनात ०.२० टीएमसी व दुसरे आवर्तन ०.१५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

भीमा नदीवरील सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका व इतर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी हिळ्ळी को. प बंधार्‍यापर्यंत (आकस्मित आरक्षणापैकी) सोलापूर महानगरपालिकेच्या मागणीनुसार पहिले आवर्तनामध्ये ५.७५ टीएमसी पाणी सोलापूर महानगरपालिकेने मागणी केल्यानंतर व  दुसर्‍या आवर्तनामध्ये ५ टीएमसी पाणी सोलापूर महानगरपालिकेने मागणीकेल्यानंतर सोडले जाणार आहे.

उन्हाळी हंगामातील आवर्तनाचा विचार करता उजनी धरणातून पहिल्या आवर्तनासाठी १५.६५  टीएमसी पाणी तर दुसऱ्या आवर्तनासाठी १५ टीएमसी पाणी असे एकुन ३०.६५ टीएमसी पाणी सोडले जाणार असल्‍याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगुले यांनी दैनिक पुढारीला दिली.