Sun, Sep 23, 2018 21:36



होमपेज › Solapur › पंढरपूर, देहू, आळंदी विकासकामांना गती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

पंढरपूर, देहू, आळंदी विकासकामांना गती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Published On: Aug 24 2018 10:57PM | Last Updated: Aug 24 2018 10:52PM



सोलापूर : प्रतिनिधी 

पंढरपूर, देहू आणि आळंदीच्या विकासासाठी 1094 कोटी रुपये मंजूर असून, 745 कोटी वितरित केले आहेत. त्यापैकी 711 कोटींची कामे झाली असून यावर्षी नव्याने 212 कोटी रुपये वितरित केले जातील. या सर्व विकासकामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विकासकामांचा आढावा घेण्यात आला. अन्न व नागरीपुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सातार्‍याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

सेवाग्राम, पवनार, वरूड या त्रिकोणाचा पूर्ण विकास करण्यासाठी एकूण 170 कोटींचा आराखडा मांडण्यात आला आहे. येथे रस्ते निर्माण, मलनिस्सारण, धाम नदीवर घाट निर्माण, सौरऊर्जा, सुशोभिकरण आदी कामांसाठी नव्याने अतिरिक्त 17 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला. सेवाग्राम येथे सुशोभिकरण कामासाठी जे.जे. आर्टस् महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असून, याठिकाणी चरखा म्युझियम करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

घाटाच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. देहू, आळंदी, पंढरपूर विकासासाठी 1094 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, 745 कोटी वितरित झाले असून यावर्षी अजून 212 कोटी रुपये वितरित केली जातील. पालखी मार्गावर शौचालयांची सुविधा, चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिर परिसर सुधारणा, नवीन बसस्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रिटीकरण, त्याचप्रमाणे वारीकाळात शौचालयांची सुविधा होण्यासाठी खासगी मठ व वाड्यांमध्ये शौचालय बांधणे, वाळवंट सुधारणा कार्यक्रम, नामदेव स्मारक उभारणी आदी कामांचा आढावा घेण्यात आला. पालखी तळाच्या ठिकाणी आणि शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी मोबाईल सुरक्षा युनिट नेमण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. 

पुणे व सोलापूर परिसरात या विकास आराखड्याच्या कामासाठी जमीन संपादनाचे काम तातडीने करावे. त्यासाठी 150 कोटी रुपये वितरित केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी देहू, आळंदी परिसरात केली जाणारी कामे, सदुंबरे विकास आराखडा, भंडारा डोंगर विकास आराखड्यातील कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार, पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते.