Thu, Nov 15, 2018 20:37होमपेज › Solapur › 'हुमणी' उसाला नव्हे 'शेतकऱ्यांना' पोखरतेय

'हुमणी' उसाला नव्हे 'शेतकऱ्यांना' पोखरतेय

Published On: Sep 01 2018 2:23PM | Last Updated: Sep 01 2018 2:23PMमोहोळ : वार्ताहर

मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सध्या उसाला हुमणी आळीने पोखरले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कारखानदारांनी शेतकऱ्यांना अनुदान देवून दिलासा देण्याची गरज आहे, असे मत प्रहारचे संपर्क प्रमुख अतुल खुपसे-पाटील यांनी व्यक्त केले.

मोहोळ तालुक्यातील कुरुल गावातील अनेक शेतकऱ्यांच्या उसाला हुमणी आळीने घेरले आहे. या परिसरातील शेकडो हेक्टर उसाचे पीक नष्ट झाले आहे. यावेळी उसाच्या पिकाची पाहणी करताना खुपसे पाटील बोलत होते. करुल परिसरातील शेतकऱ्यांनी हुमणी आळी उसाचे पीक कसे पोखरते याचे प्रात्यक्षिकच दाखवले.

दुष्काळा सारख्या संकटामुळे साखर पट्ट्यातील शेतकरी आधीच हैराण झाला आहे. शिवाय कारखानदार व शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे बळीराजा दुहेरी संकटांत सापडला असताना, त्यांच्या उसाला आता हुमणी ने वेढा घातला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर कारखानदार मोठा झाला आहे, आज तोच कारखानदार शेतकरी अडचणीत असताना मुग गिळून गप्प आहे. कृषी विभागाच्या डोळ्यावर तर पट्टीच बांधली आहे. आज शेकडो एकर ऊसाचे क्षेत्र या हुमणी मुळे बाधित झाले असून सोन्यासारख जपलेलं उसाचं पीक होरपळून जात असल्याचे पाहूण ऊस उत्पादकांचे डोळे पाणावले आहेत, असे खुपसे पाटील म्‍हणाले. 

दरम्यान, हुमणीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हजारो रुपयांची औषधे देखील कुचकामी ठरत आहेत.  हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे या हुमणीवर लवकर नियंत्रण न आणल्यास किंवा कारखानदारांनी दिलासा न दिल्यास आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहारच्या माध्यमातून लढा उभारून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.