Sat, Mar 23, 2019 16:37होमपेज › Solapur › अर्थसंकल्पात सोलापूरला ठेंगा

अर्थसंकल्पात सोलापूरला ठेंगा

Published On: Mar 09 2018 10:36PM | Last Updated: Mar 09 2018 9:39PMसोलापूर : प्रतिनिधी

2018-2019 चा  अर्थसंकल्प सादर झाला. सुधीर मुनगंटीवार यांनी चौथा अर्थसंकल्प सादर केला. परंतु या अर्थसंकल्पात सोलापूरला राज्य शासनाकडून ठेंगा दाखविण्यात आला आहे. दोन मंत्री असूनसुध्दा एकही योजना किंवा लाभ थेट सोलापूरच्या पदरात न पडल्याने सोलापूरकरांच्या पदरी निराशा पडली आहे.

युती सरकारचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत चौथा अर्थसंकल्प सादर केला. 15 हजार 385 कोटी  रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोकण आणि विदर्भाला अधिक लक्ष देण्यात आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यास मात्र दुर्लक्षित केले आहे.सोलापूरच्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या बाबींना मात्र काढीएवढा लाभ प्राप्त झालेला नाही किंवा थेट योजना किंवा निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. यामध्ये यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाच्या निर्मितीसाठी एकही उपाययोजना केली नाही व यंत्रमाग उद्योगाच्या बळकटीकरणासाठी एकही रुपयाचीसुध्दा तरतूद करण्यात आलेली नाही.

बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध केला गेला नाही. विद्यमान मंत्र्यांनी व शासकीय अधिकार्‍यांनी टेक्स्टाईल पार्क, गारमेंट पार्कनिर्मिती प्रकल्पासाठी सोलापूरकरांना मोठमोठ्या आश्‍वासनांचा डोंगर दाखविला होता. परंतु 2018-2019 च्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी या विषयाचा काढीएवढादेखील उल्लेख केला नाही. विडी उद्योगाला पर्यायी रोजगार उपलब्ध करण्यासाठी योजना आखण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु राज्यभरातील व सोलापुरातील विडी उद्योगाकडे अर्थमंत्र्यांनी पाठ दाखविली आहे.

पंढरपूर येथील तीर्थक्षेत्र विकासाकडे पूर्णत: दुर्लक्षित करण्यात आले असून  नमामी चंद्रभागा योजनेला एक रुपयासुध्दा निधीची तरतूद करण्यात आली नाही. भीमा शुध्दीकरण योजनेसदेखील दुर्लक्षित करण्यात आले आहे. भीमा नदीवर आठ ठिकाणी  व सीना नदीवर चार ठिकाणी पिण्याच्या   पाण्यासाठी व  शेतीच्या पाण्यासाठी  साठवणुकीकरिता  बॅरेजेस बांधण्यांसाठी निधीची अपेक्षा होती, परंतु या अपेक्षेचा भंग झाला आहे.  यावर्षीचे राज्य सरकारचे बजेट पाहून सोलापूरला मात्र ‘अच्छे दिन’ आले नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे. 
एकंदर पाहता सोलापूर शहराच्या कामगारांच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपयायोजना नाही.