Tue, Apr 23, 2019 00:26होमपेज › Solapur › सुधीर खरटमल यांचा पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा

सुधीर खरटमल यांचा पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा

Published On: Jan 25 2018 1:00AM | Last Updated: Jan 24 2018 10:56PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशीच बुधवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देऊन स्वतःला काँग्रेसपासून वेगळे केले. यामुळे सोलापूरच्या राजकारणामध्ये चांगलास  भूकंप  झाला असून खरटमलांच्या राजीनाम्यामागे पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून देण्यात येणार्‍या दुजाभावाच्या वागणुकीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. पक्षात आपण वरचढ होतोय, असा गैरसमज करून आपल्याला अपमानित केले जात असल्याचा आरोप खरटमल यांनी केला.

सुधीर खरटमल हे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे विश्‍वासू आहेत. खरटमल यांनी एप्रिल 2016 मध्ये काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा पदभार घेतला होता. कठीण परिस्थितीत त्यांनी काँग्रेस शहराध्यक्षपदाचा पदभार घेतला, त्यानंतर पक्षसंघटन वाढविण्याचा प्रयत्न केला. जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर सप्टेंबर 2017 मध्ये खरटमल यांनी पक्षाच्या गटबाजीला तसेच वरिष्ठांच्या नाराजीला कंटाळून त्यांनी  शहराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दिला होता. शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर खरटमल यांना प्रदेश काँग्रेस 
कमिटीवर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली होती. 

बुधवारी खरटमल   यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु, खरटमल यांनी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा यावेळी करून मोठा धक्काच कार्यकर्त्यांना दिला. 

याबाबत बोलताना खरटमल म्हणाले की, आपण राजीनामा दिल्यानंतर पक्षातील नेतेमंडळींकडून देण्यात येणार्‍या दुजाभावाच्या वागणुकीला कंटाळून आपण राजीनामा दिल्याचे सांगितले. सुशीलकुमार शिंदे यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम यशस्वी केल्यानंतर आपल्याला पक्षातीलच नेतेमंडळींकडून त्रास दिला जात होता. पक्षात आपण कुठेतरी वरचढ होतोय, असा समज झाल्याने जाणिवपूर्वक अपमानित केले जात होते. पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे खरटमल यांनी सांगितले. याबाबतचे पत्र खरटमल यांनी प्रसारमाध्यमांकडे पाठवून दिले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला चांगला धक्का बसणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.