Thu, Apr 25, 2019 05:24होमपेज › Solapur › केंद्राच्या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करा : खा. मोहिते-पाटील

केंद्राच्या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करा : खा. मोहिते-पाटील

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:43PMसोलापूर :प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या विविध  योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या विकासास गतीमान करावा. या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी कार्यरत राहावे, असे आवाहन खासदार तथा जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज येथे केले.

मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची सभा झाली.  त्या सभेत त्यांनी हे आवाहन केले.

 यावेळी समितीचे सदस्य आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक अनिल नवाळे आदी उपस्थित होते.

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण आणि शहरी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र दसरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य आराखडे, प्रस्ताव सादर करणे त्यांना मंजुरी घेणे या बाबींवर संबंधित यंत्रणांनी भर द्यावा.

आमदार गणपतराव देशमुख आणि आमदर भारत भालके यांनी सूचना मांडल्या. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, भूमि अभिलेख संगणकीकरण, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्मार्ट सिटी अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, कौशल्य विकास योजनांचा आढावा घेण्यात आला.    बैठकीस उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने आदी उपस्थित होते.