Fri, Apr 26, 2019 19:57होमपेज › Solapur › पंढरपूरच्या ‘लक्ष्मण’ची यशोगाथा

पंढरपूरच्या ‘लक्ष्मण’ची यशोगाथा

Published On: Jun 07 2018 11:02PM | Last Updated: Jun 07 2018 10:39PMसोलापूर ः बाळासाहेब मागाडे

मायनिंग व औष्णिक क्षेत्रातील काम तसे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. मात्र अशा आव्हानात्मक क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यातील एक तरुण आपली हुकूमत गाजवत असून केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या उत्तर प्रदेशातील नॉदर्न कोलफिल्ड कोळसा खाणीचा मुख्य व्यवस्थापक बनला आहे. विशेष म्हणजे या कोळसा खाणीतूनच सोलापूरच्या एनटीपीसीला दगडी कोळशाचा पुरवठा होतो. 

लक्ष्मण गोडसे असे या युवकाचे नाव आहे. गोडसे हे कासेगाव (ता. पंढरपूर) येथील रहिवासी आहेत.  दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या गोडसे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पंढरपुरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. डोक्यावर गांधी टोपी आणि अंगावर मळका शर्ट-विजार, पंढरीच्या मंडईत टोपलीत भाजीपाला विकणारा हा खेडूत युवक संघर्ष करीत राहिला. बारावीत चांगले गुण मिळाल्यानंतर अभियांत्रिकी शाखेकडे त्यांनी अर्ज केला. या विषयाबाबत ते अगदीच अनभिज्ञ होते. पुढे मायनिंग इंजिनिअरिंगला नागपुरात प्रवेश मिळाला. महाविद्यालयातही त्यांचा पायजमा, टोपीच्या वेशातच प्रवेश झाला. काही दिवसानंतर वर्गमित्रांकडून त्यांनी जुना बूट 80 रुपयाला विकत घेतला. एका मित्राने त्याची जुनी पँट दिली. 

मराठीशिवाय कोणत्याही भाषेचे तसेच इतर कुठलेही ज्ञान अवगत नव्हते. नव्या बदलाबरोबरच नवी आव्हाने मोठ्या हिमतीने स्वीकारत गोडसे यांनी उच्च गुणांसह पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील कोळसा खाणीवर कर्तृत्वाचा दबदबा सुरू केला.

हजारो कामगारांचे नेतृत्त्व

केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या  ककरी अर्थात कोळसा उत्खनन प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी गोडसे यांच्यावर असून हजारो कर्मचारी-अधिकार्‍यांचे नेतृत्त्व ते करीत आहेत. कोळशाची उल्लेखनीय उत्पादन क्षमता, प्रोजेक्ट परिसरातील चार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये या सार्‍यांचे नेतृत्व आणि जबाबदारी  त्यांच्याकडे आहे.

सोलापूरच्या एनटीपीसीला कोळशाचा पुरवठा

उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सोनभद्रा या ककरी प्रोजेक्ट अर्थात कोळसा खाणीतून सोलापूरच्या एनटीपीसी प्रकल्पाला कोळसाचा पुरवठा होतो. दर महिन्याला 8 ते 10 रॅक म्हणजेच 30 ते 40 टन दगडी कोळसा एनटीपीसीला पाठविण्यात येतो. या प्रकल्पावरुन पंजाब, कोटा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश आदी राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पांना कोळसाचा पुरवठा केला जातो. या ककरी प्रकल्पात 70 अधिकारी, कर्मचारी तसेच हजारो कामगार काम करतात. या सर्व मनुष्यबळाची धुरा लक्ष्मण गोडसे यांच्या हाती आहे. 

हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन नोकरी शोधताना मायनिंग क्षेत्र जणू ओअ‍ॅसिस बनले. उत्तर प्रदेशातील नॉदर्न कोलफिल्ड कोळसा खाणीची जबाबदारी पार पाडतानाच मी आपल्या भागातील अधिकाधिक तरुण या क्षेत्रात यावे, यासाठी प्रयत्न करीत आहे.
- लक्ष्मण गोडसे
(व्यवस्थापक- नॉदर्न कोलफिल्ड)