होमपेज › Solapur › बाजार समिती संचालकांना अटक करू नका म्हणून कोणी फोन केला?

बाजार समिती संचालकांना अटक करू नका म्हणून कोणी फोन केला?

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 11:55PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्र्यांना पुढे करून इतर मंडळींनी निवडणूक लढली आहे. 39 कोटींच्या गैरव्यवहारात गुन्हा दाखल असलेल्या संचालकांना अटक करू नका म्हणून कोणी फोन लावला, हे काय मला कळत नाही का, असे म्हणत सहकारमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या पालकमंत्री विजयकुमार देशमुखांवरच निशाणा साधला. 

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात सुभाष देशमुख यांच्या मंत्रिपदास दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहकारमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीवर भाष्य केले. 

पालकमंत्र्यांमागे मुख्यमंत्री असल्याचे विरोधक सांगत असले तरी मुख्यमंत्री असे कधीच वागणार नाहीत. ते अशा लोकांना कधी सहकार्य करणार नाहीत, असे स्पष्ट करून सहकारमंत्री म्हणाले, मी या निवडणुकीत भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याला उभे केले होते. आमच्यासमोर एक माजी केंद्रीय मंत्री, एक पालकमंत्री, दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार असे निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्या एवढ्या ताकदीसमोर आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी लढत दिली आहे. त्यावेळीच खर्‍याअर्थाने आम्ही निवडणूक जिंकली होती. विरोेधक तेव्हाच संपले होते. परंतु एक मात्र नक्‍की आहे, विरोधकांनी भाजपच्या सहकार्यामुळेच ही निवडणूक जिंकल्याचेही सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले. पालकमंत्री 39 कोटींचा गैरव्यवहार करणार्‍या संचालकांसोबत कशासाठी गेले, हे मात्र कोडे असल्याचा टोलाही सुभाष देशमुख यांनी लगावला.

ते म्हणाले, माजी सभापतींनी आपल्या बँकेत बाजार समितीच्या ठेवी ठेवल्या. हे एवढे चलाख आहेत की मुदतीपूर्वी एक दिवस अगोदर ठेवी काढल्या. म्हणजे आपल्या बँकेचे 2 टक्के वाचवले. मी यांच्यासारखा स्वार्थी नाही. मी स्वार्थी असतो तर लोकमंगलमध्ये ठेवी ठेवल्या असत्या, असेही देशमुख म्हणाले.

आता भाजपचा सभापती करून दाखवा!

विरोधकांसोबत गेलेल्या पालकमंत्र्यांना समोर करून ही निवडणूक लढविली गेली. माझे विरोधकांना आव्हान आहे, त्यांनी आता भाजपचा सभापती करून दाखवावा, असे म्हणत सहकारमंत्र्यांनी पालकमंत्र्यांचे नाव न घेता त्यांनाच आव्हान दिले.