Thu, Apr 25, 2019 03:45होमपेज › Solapur › देशमुखांचा बंगला; बुरखा फाटला

देशमुखांचा बंगला; बुरखा फाटला

Published On: Jun 04 2018 11:55PM | Last Updated: Jun 04 2018 11:47PMसोलापूर :  प्रशांत माने 

एखादी चूक अजाणतेपणाने आणि शुद्ध हेतूने अथवा अज्ञानी असल्यामुळे घडली तर ती एकवेळ समजू शकते; परंतु होटगी रोडवर अग्‍निशामकसह विविध सामाजिक कारणांसाठी शासनाने आरक्षित केलेली जागा घेण्यामागे ना. सुभाष देशमुख सारख्या उचभ्रू आणि सुशिक्षितांचा हेतूच संदि:ग्धतेत अडकल्याने त्यांचा बुरखा फाटला आहे, अशी चर्चा जनसामान्यांतून सुरू आहे. प्रस्ताव दिल्यास महापालिकेचे प्रशासन कोणतेही अनधिकृत काम अधिकृत करण्यात पटाईत असल्याचे सोलापूरकरांना ठाऊक असल्यामुळे सोलापूकरांची नाराजी या प्रकरणातील उच्चभ्रूंवर अधिक असल्याचे बोलले जात आहे.

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, उद्योजक ईगा पुरुषोत्तम, चंदा अशोक पाटील, शरद कृष्णकांत ठाकरे, मनाली शरद ठाकरे, वंदना राम रेड्डी (खरेदी कफिल शब्बीर मौलवी), डी. राम रेड्डी, श्रीकृष्ण श्यामराव कालेकर, माधवी श्रीकृष्ण कालेकर, सिध्दाराम प्रभू चिट्टे या मान्यवरांचा समावेश होटगी रोडवरील शासन आरक्षित जागा घेण्यामध्ये आहे. आरक्षित असलेली जागा खरेदी करताना या मान्यवरांनी सोलापूरचे हित लक्षात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते. 

कारण सोलापूरच्या विकासात या मान्यवरांचा मोठा वाटा आहे. या मान्यवरांनी जर का मनात आणले असते तर सोलापुरातील कोणत्याही चांगल्या परिसरातील वादग्रस्त नसलेली जागा घेऊन आपले बांधकाम केले असते. परंतु या मान्यवरांनी शासन आरक्षित जागा घेण्यामागचा त्यांचा हेतू काय, अशी शंका सामान्य सोलापूरकरांमध्ये सुरू आहे. कारण आयुष्याची पुंजी जमा करून एखादी मोळळी जागा खरेदी केल्यानंतर महापालिकेकडे रितसर बांधकाम परवाना मागितल्यानंतर पालिका प्रशासन सामान्यांना परवाना देताना शंभर त्रुटी काढून पळवापळवी करते. 

परंतु शासन आरक्षित जागा ज्यांनी घेतल्या आणि त्यावर बांधकामे ज्यांनी केली त्यांना मात्र पालिका प्रशासनाने बांधकाम परवानगी कशी दिली आणि यामागचे कारण सांगण्यासाठी सोलापूरकरांना कोण्या ज्योतिषाची गरज नाही. आरक्षित जागा घेणार्‍या मान्यवरांबाबत सोलापूरकरांच्या मनात आदराची भावना असल्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या या प्रकाराबाबत सामान्य जनतेतून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने कर्तव्य भावनेतून काम केले असते, तर सोलापुरातील उच्चभू्र काय आणि सामान्य काय, कोणत्याही वर्गाकडून गैरप्रकार झाले नसते. होटगी रोडवरील शासन आरक्षित जागा घेणारे आणि ज्यांनी बांधकाम केले त्यांची तर चूक आहेच. न्यायालयाकडून यासंदर्भात योग्य तो न्यायनिवाडा होईलच, परंतु या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या महापालिकेल्या तत्कालीन प्रशासनातील अधिकारीदेखील दोषी आहेत. त्यामुळे न्यायालयानेच संबंधित दोषींनाही धडा शिकवावा, अशी भावना सामान्य सोलापूरकरांमधून व्यक्‍त होत आहे. 

शासनाकडून आरक्षित जागा तातडीने ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने संबंधित जागेचे भूसंपादन करण्यात महापालिकेकडून दुर्लक्षच होते. होटगी रोडवरील सध्या गाजत असलेल्या आरक्षित जागेचाही असाच विषय आहे. अग्‍निशामक दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर आरक्षण नको, असा ठरावदेखील महापालिकेनेच केलेला असल्याने त्यांच्यावरदेखील कारवाई होणे अपेक्षित आहे.

जुळे सोलापुरातील आरक्षित जागेचे काय ?

होटगी रोडवरील शासन आरक्षित जागेच्या प्रकरणात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा समावेश असल्यामुळे  संपूर्ण राज्यात हे प्रकरण चर्चिले जात आहे. सोलापूर शहर व हद्दवाढमधील अनेक शासन आरक्षित जागांचा प्रश्‍न असाच गंभीर आहे.  शासनाने आरक्षित केलेल्या जागा महापालिकेकडून का ताब्यात घेतल्या जात नाहीत, यामागे नेमके गौडबंगाल काय, याची चौकशी आता वरिष्ठ पातळीवरून होण्याची गरज आहे. कारण  जुळे सोलापुरातील स्टेडियम, बसपोर्ट, बागांसाठी आरक्षित असलेल्या अनेक जागा बळकावण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हा प्रकार सुरु आहे. जुळे सोलापुरातील नागरिकांनी यासाठी मोठी आंदोलने छेडल्यानंतरही महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नसल्याची शोकांतिका आहे.