Wed, Jul 08, 2020 00:07होमपेज › Solapur › तृतीयपंथीयांना प्रवाहात आणणारा खरा ‘भाग्यवंत’

तृतीयपंथीयांना प्रवाहात आणणारा खरा ‘भाग्यवंत’

Published On: May 16 2019 2:14AM | Last Updated: May 15 2019 10:46PM
श्रीपूर : सुखदेव साठे

‘तो’ आणि ‘ती’ या दोन नैसर्गिक अभिव्यक्‍तींमध्ये जन्माला आलेले ‘ते’ हजारो वर्षांपासून आपली ओळख शोधत आहेत. समाजाने नाकारलेले सन्मानाचे माणूसपण मिळवण्यासाठी त्यांनी आता कष्ट करण्याचा, 
स्वाभिमानाने उभा राहण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्यापैकीच एक असलेल्या  दाजी भाग्यवंत यांच्या पुढाकाराने ‘ते’ आता आपले भाग्य बदलण्यासाठी धडपडत आहेत. ही कहाणी आहे मिरे (ता. माळशिरस ) येथील तृतीयपंथी समूहाची.

 नैसर्गिकरित्या आलेले अपुरेपण त्यांच्यासाठी शाप ठरते आणि ज्यांनी जन्म दिला तेच जन्मदाते आपल्या प्रतिष्ठेसाठी आपल्या मुलांना घरातून बाहेर काढतात. त्यांच्याशी असलेले रक्‍ताचेच नाही तर माणुसकीचेही नाते तोडतात.  जन्मदात्यांसह समाजानेही टाकून दिलेले हे तृतीयपंथी लोक मानसिक आधारासाठी यल्लमा देवीच्या पंथामध्ये सहभागी होतात. देवीच्या यात्रा, पारंपरिक कार्यक्रमांत नाचगाणी व  भीक मागून उपकृत जीणे जगतात. हे करीत असताना त्यांना प्रचंड अवहेलना सहन करावी लागते. जनावरांना प्रेमाने पाळणारा मनुष्यप्राणी आपल्यासारख्याच हाडामांसाच्या, चालत्याबोलत्या माणसांना मात्र  पशुपेक्षा हीन वागणूक देतो. त्यामुळेच मग वैफल्यग्रस्त, निराश झालेला ‘तो’ आणि ‘ती’ यापैकी आपण कोण? या आपल्याच ओळखीच्या शोधात तृतीयपंथी माणूस आपले माणूसपण हरवून जातो. देवीच्या नावाने पसरवलेल्या प्रथा, परंपरा आणि  अंधश्रद्धांचे ओझे घेऊन जगणार्‍या या माणसांना मग विविध व्यसने जडतात. पोट भरण्यासाठी सन्मानाचे साधन मिळत नाही. निव्वळ देवीच्या नावानेही पोट भरत नाही म्हणून मग भीक मागावी लागते. रोजच्या रोज भीक जेव्हा मिळत नाही तेव्हा मग हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो. अशावेळी आधीच किळसवाणा भासणारा हा मनुष्य  मग तिरस्कारणीयही होतो. याच तिरस्कृत जीवनाची व्यसने आणि व्याधींमुळे अकाली अखेर होते. माणुसकीच्या शोधात ते जीवनाची वाटही हरवून बसतात. या सगळ्या दुष्ट चक्रातून बाहेर काढण्यासाठी शासन व्यवस्था, समाजातील कोणताही घटक किमान माणुसकीचा सन्मान देत नाही. अशावेळी एखादा ‘भाग्यवंत’ त्याच जातकुळीत जन्माला येतो आणि या तृतीयपंथीय समाजाचे भाग्य बदलवण्याच्या प्रयत्नाला लागतो.  

मिरे (ता. माळशिरस) येथील 14 सेक्शन  परिसरात स्वत: तृतीयपंथी असलेल्या दाजी भाग्यवंत यांनी आपल्या तृतीयपंथी शिष्यांना सन्मानाने जगण्यासाठी पशुपालनाच्या व्यवसायात उतरवले आहे. मिरे  येथे यल्लमा देवीचे मंदिर आहे. चार पिढ्यांपासून भाग्यवंत कुटुंबाकडे या मंदिराचे पुजारीपण आहे. येथे अनेक तृतीयपंथीय, देवदासी आपल्या कुटुंबासमवेत राहात आहेत. या तृतीयपंथीयांनी भाग्यवंत यांना गुरु करून आपली उपजीविका  चालवत आहेत. दाजींनी सर्वांना एकत्रित घेऊन गुण्यागोविंदाने राहत आहेत. सध्या याठिकाणी  10 ते  12  तृतीयपंथी  व देवदासी राहत आहेत. प्रत्येकाला राहण्यासाठी  पत्राशेडचा निवारा  केला आहे. पारंपरिक नाचगाणी, देवदेव, जत्रा, लिंब काढणे, मोती  बांधणे आदी कार्यक्रम करतात. त्यामार्गाने मिळणारे मानधन साठवून त्यांनी भांडवल उभे केले आणि जोडधंदा म्हणून  गायी, म्हशी, शेळ्या व कोंबड्या पालन  सुरू केले आहे. सध्या यांच्याकडे 12 गायी, 10 म्हशी, 40 ते 50 शेळ्या व 160 च्या आसपास कोंबड्या आहेत. दूध, अंडी, शेळ्या, बोकड विकून गेल्या दहा वर्षांपासून  हे सर्व तृतीयपंथीय लोक उदरनिर्वाह करीत आहेत. आठवड्यातून तीन ते चार कार्यक्रम करतात. त्यानंतर राहिलेल्या वेळात बाजारात जाऊन भीक मागण्याऐवजी जनावरांची देखभाल करत असतात. गेल्या दहा वर्षांपासून या तृतीयपंथीय वसाहतीमधील एकानेही भीक मागण्यासाठी बाजारात पाऊल ठेवलेले नाही की कुणाला विक्षिप्त पद्धतीने त्रास दिलेला नाही. एका सर्वसामान्य माणसांसारखे जगण्याचा, सार्वजनिक ठिकाणी वागण्याचा ते प्रयत्न  करीत आहेत. त्यांच्या या बदलावर मिरे परिसरातील नागरिकही खूश आहेत. याठिकाणी तृतीयपंथीय  मनीषा साबळे, करवंदा साठे, कशिश कातकाडे, माधुरी कोळी, शालन सोळंखी, झुंबर मिसाळ, शुभम शिंदे, आशाबाई सरवदे, रेखा मोरे व रंजना हाके  आदी आपल्या कुटुंबांसह राहत आहेत. दाजी भाग्यवंत हे  या सर्वांची  पालकासारखी काळजी घेतात.  ज्या निराधार व वयोवृद्ध महिला आहेत अशांना साडी-चोळी, कपडे व भाजीपाला, धान्यसुद्धा पुरवतात. 

सहकारमहर्षींच्या दूरद‍ृष्टीने सहकारी साखर कारखानदारी, दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री फार्ममुळे सर्वांगीण विकास साधल्याचा माळशिरस तालुक्याचा नावलौकिक राज्यस्तरावर आहे.  याच माळशिरस तालुक्यातील मिरे येथे या लोकांच्या सन्मानासाठी, स्वाभिमानाने जगण्यासाठी  दाजी भाग्यवंत यांच्यासारखा एखादा त्यांच्यातीलच माणूस उभा राहतो आणि त्यांच्या प्रयत्नाला यशही मिळते. हे तृतीयपंथीय समाजाच्या सामाजिक परिस्थितीच्या बदलाचे सूचक लक्षण मानले जात आहे. 

राज्यातील पहिला तृतीयपंथी सरपंच
माळशिरस तालुक्यातील तरंगफळ या गावच्या लोकनियुक्‍त सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत माऊली खंडागळे या तृतीयपंथी व्यक्‍तीची सरपंचपदी निवड झाली आहे. माऊली खंडागळे हेे राज्यातील पहिले तृतीयपंथी सरपंच ठरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर माळशिरस तालुक्यातच तृतीयपंथीयांना स्वाभिमानाचे, सन्मानाचे जगणे बहाल करण्यासाठी मिरे येथे प्रयत्न सुरू आहेत, हे विशेष !