Sun, Sep 23, 2018 20:43होमपेज › Solapur › लाचखोर सहायक भांडारपालास अटक

लाचखोर सहायक भांडारपालास अटक

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 10:13PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

भाड्याने घेतलेल्या जीपचे बिल देण्यासाठी 1600 रुपयांची लाच घेणार्‍या भीमा पाटबंधारे विभागाच्या सहायक भांडारपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केले. सहायक भांडारपाल संगाप्पा शंकर ओलेकर (वय 30, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार यांची जीप (क्र. एम.एच. 45 ए 7535) ही भीमा पाटबंधारे विभागाच्या पंढरपूर कार्यालयात ऑफिस कामकाजासाठी भाड्याने घेतली होती.

त्याचे 42 हजार 264  रुपयांचे बिल मंजूर करून ते बिल देण्यासाठी तक्रारदाराने कार्यालयाकडे अर्ज दिला होता. ते बिल देण्यासाठी सहायक भांडारपाल संगाप्पा ओलेकर याने तक्रारदाराकडे 1600 रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुरुवारी पंढरपूर येथील भीमा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सापळा लावला होता. लाचेची रक्‍कम घेताना सहायक भांडारपाल ओलेकर यास पथकाने रंगेहाथ अटक केली. याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मारकड तपास करीत आहेत.