Thu, May 23, 2019 21:18
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सोलापूर : माळीनगर येथील प्रस्तावित उड्डाण पूल रद्दसाठी रास्ता रोको 

सोलापूर : माळीनगर येथील प्रस्तावित उड्डाण पूल रद्दसाठी रास्ता रोको 

Published On: Jun 15 2018 7:49PM | Last Updated: Jun 15 2018 6:37PMमाळीनगर  : वार्ताहर 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 (पाटस -इंदापूर -बोडंले )वरील माळीनगर ता. माळशिरस या गावातील उड्डाणपूल रद्द करण्यात यावा या मागणीसाठी माळीनगर नागरिकांच्यावतीने आज, शुक्रवार (दि.१५ जून) रास्ता रोको करण्यात आला. यामध्ये सर्व नागरिक, ग्रामपंचायत, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि माळीनगर, सभासद, कामगार, व्यापारी, तसेच विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी गावांतील सर्व व्यवहार बंद ठेवत निषेध करण्यात आला. कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी माळशिरस उपविभाग अकलूज यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले . 

माळीनगर ता. माळशिरस या गावातील उड्डाणपूल रद्द करावा आणि याठिकाणी पर्यायी बायपास मार्ग करावा या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने हा रस्ता रोको करण्यात आला. माळीनगर हे गाव अकलूज -टेंभुर्णी मार्गावर  पूर्व पश्चिम हे गाव वसलेले आहे. या गावात शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी साखर कारखाना आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर हा उड्डाणपूल झाल्यास संत तुकाराम महाराज पालखीचे सोहळ्याचे होणारे रिंगण उड्डाण पुलामुळे होणार नाही. त्यामुळे अनेक वर्षे चालत आलेली परंपरा नष्ट होईल. तसेच गावातील बाजार पेठ, छोटे मोठे व्यावसायिक यांची उपजीविका यावरच अवलंबून आहे. त्यामुळे या गावात उड्डाणपूल झाल्यास उपजिविकेचे साधन नष्ट होईल. यासर्व गोष्टीचा विचारकरून याठिकाणी होत असलेला हा उड्डाणपूल रद्द करून योग्य पर्यायाचा विचार करून याबाबत निर्णय घेतला जावा याबाबतचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. 

या रास्तारोकोस माळीनगर मधील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार यांनी  पाठिंबा दिला. यावेळी विवेक देशमाने शिवसेना, बापू बनकर कामगार युनियनचे नेते, अमित व्होरा व्यापारी, अभिमान जगताप सरपंच माळीनगर, भानुदास दळवी जेष्ठ कार्यकर्ते, प्रकाश कांबळे आर पी आय, महादेव बंडगर सदस्य, प्रकाश पाटील काँग्रेस नेते, राजेंद्र गिरमे मॅनेजिंग डायरेक्टर यांची भाषणे झाली. यावर योग्य तोडगा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

याप्रसंगी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र भाऊ गिरमे, संचालक मोहन लांडे, पृथ्वीराज भोंगळे,अनिल रासकर, ग्रामपंचायत सरपंच गणेश जगताप तसेच व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, शिक्षक, कामगार, मजूर, अनेक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.