Wed, Apr 24, 2019 22:13होमपेज › Solapur › पंढरपुरात अण्णा भाऊंच्या प्रतिमेची विटंबना

पंढरपुरात अण्णा भाऊंच्या प्रतिमेची विटंबना

Published On: Aug 10 2018 11:47AM | Last Updated: Aug 10 2018 11:47AMपंढरपूर : प्रतिनिधी

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या येथील लहुजी वस्ताद चौकात असलेल्या प्रतिमेवर गुरुवारी सायंकाळी दगडफेक केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर पंढरपुरात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी  मध्यरात्री दोन समाजकंटकांची नावे निष्पन्न झाली असून त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. 

गुरूवार, 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दिवसभर पंढरपूर बंद पुकारण्यात आले होते. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सायंकाळी 6 नंतर शहरातील काही भागांत दुकाने उघडली जात असताना 10 ते 15 युवकांचे एक टोळके लहुजी वस्ताद चौकात आले आणि दुकाने बंद करण्यासाठी दबाव टाकत होते. त्याचदरम्यान येथे असलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेतील प्रतिमेवर दगड टाकण्यात आले. त्यानंतर मोटारसायकलवरील समाजकंटक पसार झाले. दरम्यान, पंढरपूर शहरात हा प्रकार समजताच वातावरण तणावग्रस्त झाले. विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते लहुजी वस्ताद चौकात एकत्र आले आणि दगडफेक करणार्‍यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. 

पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा याप्रकरणी अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला तसेच मध्यरात्रीच एका संशयीत आरोपीस अटक केली आहे. दोनजणांची नावे, मोटारसायकलचे क्रमांक निष्पन्न झाले आहेत. त्यावरून आरोपींचा शोध गेतला जात आहे. पोलसांनी संबंधित समाजकंटकांवर कारवाईचे आश्‍वासन देऊन सर्व दलित समाज संघटनांना शांततेचे आवाहन केले आहे. अण्णा भाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा वाघमारे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश यादव, दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष  दिलीप देवकुळे, रिपाइंचे नेते जितेंद्र बनसोडे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड, माजी नगरसेवक अंबादास वायदंडे यांच्यासह दलित समाजातील संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी शहरात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केला.  शुक्रवारी  शहरात काही युवकांनी शहर बंद करण्याचा प्रयत्न केला आणि शहरातील अनेक भागांत लोकांनी दुकाने बंद केली. शहरात अफवा पसरून दुकाने बंद केली जात असल्याचे समजताच ज्येष्ठ नेते नाना वाघमारे, नागेश यादव यांनी शहरात फिरून व्यापार्‍यांना दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले तसेच  रिक्षा फिरवून व्यापार्‍यांना बंद  नसल्याचे सांगून दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. पोलिस उपाधीक्षक सागर कवडे, शहर पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडोळे यांनीही शहरात फिरून दुकाने बंद करणार्‍यांना बंद नसल्याचे सांगितले तसेच लहुजी वस्ताद चौकात येऊन त्याठिकाणी जमलेल्या युवकांची, दलित पदाधिकार्‍यांची भेट घेऊन  शांतता राखण्याचे आवाहन करून सर्व समाजकंटकांना अटक करण्याची ग्वाही दिली. दरम्यान, मंगळवेढा बायपास मार्गावर दगडफेक करून अज्ञातांनी सरकोली-पंढरपूर (एमएच 12 सीएच 7682) बसच्या काचा फोडल्या. यावेळी बसचालकाच्या डोक्याला दगड लागून तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील लहुजी वस्ताद चौकात मोठ्या संख्येने युवक जमलेले आहेत. सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी शांततेचे आवाहन केले असून शहरात फिरून या नेत्यांनी बंद नसल्याचे सांगून व्यापार्‍यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले आहे.  दोन दिवसांपासून मराठा मोर्चा आणि बंदमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले असताना पुन्हा तिसर्‍या दिवशीही तणाव निर्माण झाल्यामुळे पंढरपूरकर अस्वस्थ झाले आहेत.

रिक्षा आणि मोटारसायकल पेटवली 
गुरूवारी रात्री संत पेठ भागातील एक रिक्षा आणि एक मोटारसायकल अज्ञातांनी पेटवून दिली आहे. शुक्रवारी सकाळी शहर बंदची अफवा पसरल्यानंतर सर्व व्यापार्‍यांनी आपापली दुकाने पटापट बंद करून घेतली. मात्र नंतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह पोलिसांनी आवाहन केल्याने दुकाने उघडून शहर सुरळीत झाले.