Wed, Jun 26, 2019 18:22होमपेज › Solapur › नवीन पोलिस ठाणे देण्याचा प्रयत्न करू

नवीन पोलिस ठाणे देण्याचा प्रयत्न करू

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 9:49PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाकडून 4 नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला  असून  तो   शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत लवकरच बैठक घेऊन  शहरासाठी जास्तीत जास्त नवीन पोलिस ठाणे देण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.

गृहराज्यमंत्री  डॉ. पाटील   हे गुरुवारी सोलापूरच्या दौर्‍यावर आलेले आहेत. सकाळी  त्यांनी सोलापूर   शहर   पोलिस  आयुक्तालयाला भेट  देऊन  अधिकार्‍यांची  बैठक घेतली. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते आयुक्तालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले  व   नूतनीकरण  करण्यात आलेल्या लेखा विभागाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा केल्याबाबत सहायक पोलिस निरीक्षक वैभव माळी यांना विशेष सेवापदक डॉ. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळालेले आहे. त्या पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांचा सत्कार तसेच सदर बझार पोलिस ठाण्याला मिळालेल्या आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांना प्रदान करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त नामदेव  चव्हाण, अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले-श्रींगी उपस्थित होते. 

यानंतर पत्रकारांशी बोलताना गृहराज्यमंत्री   डॉ. पाटील  यांनी राज्यातील   पोलिसांना  मुंबई पोलिसांच्या धर्तीवर 8 तासांची ड्युटी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलिसांसाठी नवीन रहिवासी वसाहती निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून  स्कीम राबविल्या जात आहेत. सोलापूरच्या प्रस्तावाबाबतही माहिती घेतली असून तो लवकरच मार्गी लावण्यात येईल. पोलिसांचे आधुनिकीकरण करण्यासाठी या शासनाने प्रत्येक जिल्ह्याला फॉरेन्सिक लॅब दिलेली  आहे. सायबर पोलिस ठाणे तयार केली आहेत. पोलिस दल एक व्हावे यासाठी सीसीटीएनएसद्वारे पोलिस ठाणे जोडण्यात आली आहेत.  गुन्हेगारांवर  वचक व लक्ष ठेवण्यासाठी शहरांमधून सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येत आहे. पोलिस दलात तपास यंत्रणा आणि बंदोबस्त हे वेगवेगळे असावेत असा प्रस्ताव शासनाकडे असून त्याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही.

याप्रसंगी आयुक्तालयातील सुमारे 25 सफाई कामगारांनी त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी गृहराज्यमंत्र्यांना भेटून केली.