Tue, Jul 07, 2020 11:11होमपेज › Solapur › छोट्या उद्योगांना राज्य बँकेतर्फे कर्ज

छोट्या उद्योगांना राज्य बँकेतर्फे कर्ज

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:23PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

राज्य सहकारी बँकेने यापुढील काळात कर्जे देण्याच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे छोटे उद्योजक तयार व्हावेत, याद‍ृष्टीने अशा उद्योजकांना कर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष एम. एल. सुखदेव यांनी दिली. 

दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई आणि नागरी बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशनच्या वतीने आयोजित बैठकीसाठी सुखदेव हे सोलापुरात आले आहेत. रविवारी त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन बँकांचे प्रश्‍न आणि इतर बाबींवर चर्चा केली. 

सुखदेव म्हणाले की, राज्य सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती आता पूर्णपणे सक्षम झाली आहे.  बँक नफ्यात आहे. त्यामुळे आम्ही आता ग्रामीण भागात आपला विस्तार आणखी घट्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

 राज्य बँक म्हटले की, केवळ साखर कारखानदारांना कर्जे देणे एवढेच लोकांना अपेक्षित होते. यापुढील काळात छोट्या-छोट्या उद्योजकांना कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य बँक प्रयत्नशील असणार आहे. यासाठी विशेष निधीची तरतूद आम्ही करणार आहोत. 

जिल्हा मध्यवर्ती बँकांची असलेली आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सहकारमंत्री देशमुख यांनी सर्वच सहकारी संस्था राज्य बँकेशी संलग्‍न करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यावर योग्य तो सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ असेही सुखदेव यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राज्य बँकेचे संचालक विद्याधर अनासकर, अविनाश महागावकर, सरव्यवस्थापक अजित देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महेश देशमुख आदी उपस्थित होते.