Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Solapur › सोलापुरात 'स्वाभिमानी'ने सदाभाऊ खोतांची कार फोडली (Video)

सोलापुरात 'स्वाभिमानी'ने सदाभाऊ खोतांची कार फोडली (Video)

Published On: Feb 24 2018 12:00PM | Last Updated: Feb 24 2018 8:50PMमाढा : मदन चवरे

सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यातील गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करत इनोव्हा कारची तोडफोड केली. ही घटना रिधोरे (ता. माढा) येथे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेने ना. खोत यांच्याबाबत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची खदखद बाहेर पडली आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले.

माढा लोकसभा अंतर्गत येणार्‍या रिधोरे (ता. माढा जि. सोलापूर) येथे स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष तथा माजी सैनिक बापू गायकवाड यांनी ही कार फोडली असल्याचे सांगण्यात आले. ना. खोत हे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पंढरपूरहून बार्शीकडे निघाले होते. कुर्डूवाडी (ता. माढा) येथे बायपासवर स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष महावीर सावळे, संघटक सिध्देश्‍वर घुगे सत्यवान गायकवाड यांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. काळे झेंडे दाखवले. तूर, गाजर, मका मंत्र्यांच्या गाडीवर फेकले. या प्रकारानंतर कुर्डूवाडी पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष महावीर सावळे, जिल्हा संघटक सिध्देश्‍वर घुगे व सत्यवान गायकवाड या चार कार्यकर्त्यांना लागलीच ताब्यात घेतले.

वाचा : बांडगुळांना मी घाबरत नाही : सदाभाऊ (Video)

ना. खोत पंढरपूर ते बार्शी या रस्त्यावर रिधोरे या गावी रयत क्रांती च्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सत्कारासाठी थांबले. त्यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना ऊसाचा पहिला हप्ता कारखानदार ठरल्यापेक्षा कमी देतात, तुरीचा घोटाळ्याचा टेम्पो पकडून दिला होता. त्याचे पुढे काय झाल? त्यावर सरकार व तुम्ही काहीच भूमिका का घेत नाहीत अशी विचारणा केली. त्याकडे दुर्लक्ष केल्याने चिडून जाऊन स्वाभिमानीचे बापू गायकवाड यांनी लोखंडी पाईपने ना. खोत यांच्या ताफ्यातील गाडीची काच फोडली. त्यानंतर ना. खोत यांचेसोबत असलेले काही व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी तत्काळ यात हस्तक्षेप करत हल्लेखोरांना ताब्यात घेतले. यानंतर ना. सदाभाऊ खोत हे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पर्यायी वाहनाने दडशिंगे ता.बार्शीकडे रवाना झाले. त्यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नसून ते सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाचा : सदाभाऊ खोतांवरील हल्‍ल्याचे इस्‍लामपुरात पडसाद (Video)

ना. सदाभाऊ खोत यांनी लोकसभा निवडणूक ही माढा मतदारसंघातून लढवली होती. चुरशीच्या लढतीत ते राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून  पंचवीस हजार मतांच्या फरकाने   पराभूत झाले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पंढरपूर व करमाळा या ठिकाणी स्वाभिमानीचे उमेदवार साखर कारखानदार संजयमामा शिंदे व प्रशांत परिचारक हे ही अल्प मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळी ना. सदाभाऊ खोत यांनीच या दोन कारखानदारांना विधानसभेसाठी तिकीट दिल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते नाराज झाले होते. यानंतर सदाभाऊ खोत व खा. राजू शेट्टी यांच्यातही मतभेद झाले. स्वाभिमानीपासून सदाभाऊ खोत दुरावले गेले. भाजपच्या माध्यमातून आमदार झाल्यावर ते नामदार झाले.शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर स्वाभिमानी रस्त्यावर उतरत असताना सदाभाऊ अलिप्त राहत होते. या सर्व प्रकरणांचा रोष स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होता.