Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Solapur › आर्थिक बचतीसाठी राज्य शासनाचा नवा फंडा

आर्थिक बचतीसाठी राज्य शासनाचा नवा फंडा

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 6:31PMसोलापूर : रणजित वाघमारे

शासकीय कार्यालयांत वातानुकूलित यंत्रणेचा अनावश्यक वापर होतो, हे नेहमीच निदर्शनास येते. परंतु आता या अनावश्यक वापरावर शासनाकडून निर्बंध आणण्यात आले आहेत. आर्थिक व वीज बचतीसाठी शासनाने नवा फंडा आणला असून प्रत्येक शासकीय कार्यालयांतील वातानुकूलित यंत्राचे तापमान 24 डिग्री से. ठेवण्याचा फतवा काढला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालयांत मोठ्या प्रमाणात वातानुकूलित यंत्राचा वापर होत आहे. येथे बर्‍याचठिकाणी 18 ते 20 डिग्री से. असे तापमान ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अनावश्यक विजेचा वापर होऊन शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. ऊर्जा निर्माण करणार्‍या करणार्‍या स्त्रोतांचा वापर अधिक प्रमाणात होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व शासनाचे आर्थिक नुकसाण टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी ईफिशियन्सी (बीईई) व्दारे ही सूचना करण्यात आली आहे. 

शासनाचे नवे आदेश
वातानुकूलित यंत्रणा 24 डिग्री से. तापमानावर वापरले असता विजेची बचत होते. हे तापमान मानवी शरीराला आवश्यक आर्द्रता आणि योग्य हवेचे अभिसरणाकरिता सर्वोत्तम आहे. यामुळे बाहेरून येणार्‍या व्यक्तींना तापमानातील विषम बदलाला सामोरे जावे लागत नाही. हे तापमान वातावरणास पोषक व ग्रीन बिल्डिंग संकल्पनेस पूरक राहील. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून शासनाने सर्व संबंधित शासकीय कार्यालये, इमारती आणि विश्रामगृहे येथे 24 डिग्री से. तापमान ठेवण्याचे आदेश दिले आहेत.