होमपेज › Solapur › स्थायी समिती सभापती निवडणुकीला स्थगिती

स्थायी समिती सभापती निवडणुकीला स्थगिती

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 06 2018 9:29PMसोलापूर : प्रतिनिधी 

वादग्रस्त ठरलेल्या महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सत्ताधार्‍यांना जोरदार हादरा बसला आहे. या स्थगितीमुळे बुधवारी होणारी निवडणूक रद्द झाली असून, याप्रकरणी पुढील सुनावणी 19 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. सभापतिपदाचा नियोजित निवडणूक कार्यक्रम रद्द करून तो नव्याने घेण्याच्या विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला शिवसेनेने सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर मंगळवारी दुपारी चार वाजता सुनावणी झाली.  दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दिली.

याप्रकरणी पुढील सुनावणी 19 मार्चला होणार असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयात आज झालेल्या सुनावणीचा संपूर्ण तपशील अद्याप मिळावयाचा आहे, असे स्पष्ट केले. न्यायालयाच्या या आदेशामुळे मनपातील सत्ताधारी भाजपला मोठा हादरा बसला आहे. या आदेशामुळे सभापतिपदाबाबत पक्षांतर्गत झालेली गटबाजी सत्ताधार्‍यांना भोवली आहे. सत्ताधारी व विरोधक या दोहोंनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. स्थगितीमुळे बुधवारी होणारी निवडणूक रद्द झाली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निकाल शिवसेनेच्या बाजूने लागेल, असा विश्‍वास कोठे यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, मंगळवारी सकाळी सभापतिपदासाठी भाजपकडून राजश्री कणके यांनी दोन, तर विरोधी पक्ष शिवसेनेतर्फे गणेश वानकर यांनी एक अर्ज दाखल केला.  पोलिसांनी कौन्सिल हॉलजवळ मोठा बंदोबस्त ठेवला होता. उमेदवार व त्यांच्यासमवेत चार व्यक्तींशिवाय कौन्सिल हॉलमध्ये कोणालाही प्रवेश दिला गेला नाही. भाजपच्या राजश्री कणके यांनी दोन अर्ज दाखल केले. एका अर्जावर नागेश वल्याळ हे सूचक, तर मनीषा हुच्चे अनुमोदक आहेत. दुसर्‍या अर्जावर विनायक विटकर, जुगनबाई अंबेवाले यांनी अनुक्रमे सूचक व अनुमोदक म्हणून सही केली. अर्ज भरतेवेळी महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समिती सदस्या मनीषा हुच्चे, जुगनबाई अंबेवाले होत्या. शिवसेनेतर्फे गणेश वानकर यांनी अर्ज भरला. वानकर यांच्या अर्जावर विठ्ठल कोटा, भारतसिंग बडूरवाले हे अनुक्रमे सूचक व अनुमोदक होते.

यावेळी शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख तथा मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे, शहराध्यक्ष प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते. अर्ज भरल्यावर पत्रकारांशी बोलताना महापौरांनी अर्ज शांततापूर्ण वातावरण भरल्याचे सांगत विजयाचा दावा केला, तर गुरूवारी अर्ज भरतेवेळी माझ्यावर अन्याय झाला होता. आता पुन्हा नव्याने अर्ज भरला असून विजय निश्‍चित असल्याचे कणके यांनी सांगितले. महेश कोठे म्हणाले, शिवसेनेने आज अंडरप्रोटेस्ट अर्ज भरला आहे. तसे पत्र नगरसचिवांना दिले आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला बाधा येऊ नये अशा पद्धतीचा हा अर्ज आहे.

आम्हाला खात्री आहे की न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल. नवीन निवडणूक प्रक्रिया रद्द करून जुनी प्रक्रिया राबविण्याचा निकाल लागेल, अशी आम्हाला आशा आहे. उमेदवार वानकर म्हणाले, उच्च न्यायालयात आज होणार्‍या सुनावणीवेळी निकाल योग्य लागेल, अशी खात्री आहे.  दुपारी न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर शिवसेनेच्या गोटात आनंद व्यक्त झाला.  अपेक्षित असलेला आदेश न्यायालयाने दिल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने दिली. या प्रकरणी न्यायालय काय अंतिम निकाल देणार याकडे सत्ताधारी भाजप व विरोधी  पक्ष शिवसेनेचे लक्ष लागले आहे.