होमपेज › Solapur › केरळ पुराचा असाही फटका; मसाल्यांना महागाईचा ठसका

केरळ पुराचा असाही फटका; मसाल्यांना महागाईचा ठसका

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 10:26PMसोलापूर : इरफान शेख

केरळमधील पुरामुळे वेलची, मिरी, तमालपत्र आदी मसाल्यांचे पदार्थ महागले असून या मसाल्यांच्या दरामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक  बाजारात गेल्या महिन्याभरात हे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही या मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकांना बसू लागला आहे.

सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मसाल्यांचा मोठ्या प्रमाणात घाऊक व्यापार चालतो. केरळमधील पूर स्थितीमुळे वेलची, मिरी आणि तमालपत्र येण्याचे प्रमाणही वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी झाले आहे. पुरवठ्याचा तुडवडा झाल्यामुळे साहजिकच या पदार्थांची दरवाढ झाली आहे. कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मिती आपत्तीमध्ये त्या प्रदेशामधील उत्पादनांवर विविध प्रकारे परिणाम होत असतो. 

त्यामुळे गरम मसाल्यातील या पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. सोलापूर एपीएमसी बाजारात मिरीचे दर सध्या तीनशे  ते चारशे रुपये किलो असून घाऊक बाजारात हा दर शंभर ते दीडशे रुपयांनी अधिक आहे. 

घाऊक आणि किरकोळ बाजारांतील किंमतीमध्ये तफावत असल्यामुळे घाऊक मसाला विक्रीचे दर वाढले की त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर होत आहे.सुट्या मसाल्याच्या दरांमध्ये दहा ते पंधरा रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. महाराष्ट्र  राज्यात तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतूनही गरम मसाल्याचे पदार्थ येतात. त्यामुळे सोलापूर व इतर जिल्ह्यांच्या बाजार समित्या केरळवर पूर्णपणे अवलंबित्व नाही. सात ते दहा टक्के सुके खोबरे हे केरळमधून बाजारात येते. सुक्या खोबर्‍याचे दर गेल्या दोन महिन्यांअगोदरच वाढले आहेत.

दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलो खोबरे झाले आहे. रेडिमेड मसाल्यांमध्ये दरवाढीचा परिणाम दिसेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण सद्यस्थितीला रेडिमेड किवा पाकिटांमधील मसाले वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.

नागरिकांना गरम मसाल्यांचा ठसका
केरळमध्ये आलेल्या भयानक पुरामुळे तेथील व्यापारांवरदेखील मोठा परिणाम झाला आहे. गरम मसाल्यांसाठी प्रसिध्द असलेल्या केरळात गरम मसाल्यांच्या शेतीवरदेखील परिणाम झाला असून पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे काळी मिरी, वेलची, तमालपत्र हे मसाल्यात वापरले जाणारे पदार्थ महागले असून नागरिकांना गरम मसाल्याचा ठसका बसत आहे.