होमपेज › Solapur › औरंगाबाद इज्तेमासाठी सोलापुरातून विशेष ट्रेन

औरंगाबाद इज्तेमासाठी सोलापुरातून विशेष ट्रेन

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 21 2018 1:19AMसोलापूर : प्रतिनिधी

औरंगाबाद येथे होणार्‍या राज्यस्तरीय इज्तेमाला (प्रवचन) जाण्यार्‍या भाविकांसाठी सोलापूर रेल्वे विभागातून विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर शहर व जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येने मुस्लिम भाविक दाखल होण्याच्या तयारीत आहेत.

औरंगाबाद येथे  24, 25, 26 फेब्रुवारी असे तीन दिवस राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन केले आहे. यासाठी रेल्वे गाडी क्रमांक 01321 गुलबर्गा स्थानकातून 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुटेल. सोलापूर रेल्वेस्थानकात  दुपारी 2.50 वाजण्याच्या सुमारास पोहोचेल. दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर 3 वाजता औरंगाबादकडे रवाना होईल.कुर्डुवाडी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी आणि परभणी या स्थानकांवर थांबा घेत 24 तारखेला औरंगाबाद स्थानकावर पोहोचणार असल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली. तीन दिवसांच्या इज्तेमानंतर 26 फेब्रुवारी रोजी पुन्हा औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गाडी क्रमांक 01322 विशेष ट्रेन निघेल. औरंगाबाद, परभणी, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, सोलापूर असे थांबे घेत गुलबर्गा या स्थानकापर्यंत धावणार आहे.

दरवर्षी अशा राज्यस्तरीय इस्तेमाचे आयोजन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत केले जाते.प्रत्येक राज्यांत राज्यस्तरीय इस्तेमा पार पडतात. दोन महिन्यांपूर्वी भोपाळ (म.प्र) येथे मोठा इस्तेमा पार पडला. यामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. अशा इस्तेमांमधून शांतीचा मार्ग व प्रेमाचा संदेश देण्यात येतो. शांतीच्या मार्गासाठी 40 दिवस व 4 महिन्यांच्या जमाती तयार करून वेगवेगळ्या जिल्ह्यांत पाठविले जाते. औरंगाबाद येथे होणार्‍या इस्तेमाला राज्यभरातून सुमारे 25 लाख भाविक दाखल होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इस्तेमाला जाणार्‍या भाविकांनी या विशेष ट्रेनचा लाभ घ्यावा व तिकीट आरक्षण करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.