Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Solapur › ज्वारीचे पीक; लाखाचे बारा हजार

ज्वारीचे पीक; लाखाचे बारा हजार

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 10:19PMकरमाळा : अशोक नरसाळे

तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाची काढणी जोरात सुरू असून सध्या ज्वारी काढणीसाठी येणार्‍या खर्चाचा विचार करता शेतकर्‍याची गत शेती करणे म्हणजे ‘लाखाचे बारा हजार करणे’ यासारखी होऊन बसली आहे. काळ्या आईनेच दगा दिल्यामुळे बळीराजाही चिंताक्रांत बनला आहे. 

जिल्ह्यात मंगळवेढा आणि करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. करमाळा तालुक्यात 118 गावांचा समावेश असून यामध्ये पश्‍चिम भागातील 35 गावे वगळता अन्य भागांमध्ये पारंपरिक पध्दतीने शेतीचा व्यवसाय करणारा शेतकरी आहे. वर्षाकाठी खरीप व रब्बी हे दोन हंगाम आपल्या शेतावर घेऊन वर्षाकाठी लागणारा खर्च या उत्पादनातून भागवणे एवढाच उद्देश या भागातील शेतकर्‍यांच्या मनामध्ये असतो. एकतर शेती म्हणजे पावसावर अवलंबून असलेला जुगार असून पाऊस पडला तर शेती पिकते, अन्यथा पीक तर सोडाच साधे जनावरांना व माणसांना लागणारे पाणीसुध्दा या भागामध्ये मिळत नाही. सततचा दुष्काळ विचारात घेता यावर्षी उत्तम प्रकारचा पाऊस झाला. 

अवकाळीचा फटका
पाण्याची पातळी जमिनीमध्ये खोलवर गेल्यामुळे विहिरी, नदी, नाले यांना बर्‍यापैकी पाण्याची साठवण झाली. असे असताना यावर्षी ज्वारीचे उत्तम पीक शेतकर्‍यांना चार पैसे हाती देईल, अशी स्थिती असताना ज्वारीची पेरणी केल्यानंतर अधून-मधून या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव झाला. ढगाळ वातावरणामुळे ज्वारीचे पीक उत्तम प्रकारे येऊ शकले नाही. ज्वारीच्या चिपाडांची वाढ झाली मात्र, कणसामध्ये दाणा भरण्याची प्रक्रिया सुरू असताना अवकाळी पाऊस पडल्यामुळे उभे पीक पावसाच्या पाण्यामुळे भिजले. त्यामुळे पांढरी शुभ्र येणारी ज्वारी ही लालसर स्वरूपाची तयार झाली. असे असताना शेतावरील ज्वारीचे पीक काढले तर पाहिजे.

या उद्देशाने आज शेतकरी आपल्या शेतावरील सुगी करत असताना सध्या दिवसाकाठी ज्वारी काढण्यासाठी पुरूष मजूर 500 रु., तर स्त्री मजूर 300 रु. दिवसाची मजुरी मागत आहे. दिवसाकाठी 150 पेंढ्यासुद्धा हे मजूर शेतावर काढत नसल्यामुळे शेती करणे म्हणजे मजुरांसाठी, अशा प्रकारची गत शेतकर्‍यांची होऊन बसली आहे. ज्वारीची काढणी झाल्यानंतर कणसाची मोडणी करणे, त्यानंतर मळणी यंत्राव्दारे मळणी करणे, शेतावर पडलेला कडबा गोळा करून त्याची गंज लावणे या सर्व प्रक्रिया करण्यासाठी शेतकर्‍याला एकरी तीन हजार रूपयांपेक्षा जादा खर्च येत असताना प्रत्यक्षामध्ये ज्वारीचे पीक ज्यावेळी बाजारामध्ये विक्रीसाठी शेतकरी घेऊन येईल, त्यावेळी ज्वारीच्या एका क्विंटलचा भाव हा कमीत कमी 1800 रु. पासून ते 3000 रु. ते 4000 रु. पर्यंत मिळत असताना मिळणारे उत्पन्न हे संपूर्णत: खर्चामध्ये जात असल्याचे वास्तविक चित्र शेतकर्‍यांकडून सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत शेती करावी की नाही, शेती करावयाची ती कोणासाठी? स्वत:साठी की मजुरांसाठी? अशा प्रकारची गत शेतकर्‍यांची झाली आहे.

ज्वारीवर पडलेल्या रोगामुळे  ज्वारीचे उत्पादन घटले असून एकरी दोन पोतेसुध्दा ज्वारी निघत नाही. हरभरा, गहू ही पिके बर्‍यापैकी उत्पन्न देत असली तरी या पिकांची संपूर्ण प्रक्रिया करेपर्यंत शेतकर्‍यांना उत्पादनापेक्षा खर्चच जास्त होताना दिसत आहे. शासनाकडून सोयाबीन, तूर, कापूस अशा पिकांना ज्याप्रमाणे हमीभाव दिला जातो. तशा पध्दतीने शेतकर्‍याच्या संपूर्ण पिकाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांनासुध्दा हमीभाव मिळणे गरजेचे आहे. उत्पादनाचा विचार करता वर्षभर लागणारी ज्वारी व जनावरांना लागणारा कडबा या दोन गोष्टी वर्षभर पुरेल एवढा साठा या उत्पादनातून शेतकर्‍यांच्या घरी शिल्लक राहिला तरी पण तो समाधानी राहणार आहे.