Mon, Jul 22, 2019 05:07होमपेज › Solapur › सोन्‍नलगी ते स्मार्ट सिटी; व्हाया सोलापूर

सोन्‍नलगी ते स्मार्ट सिटी; व्हाया सोलापूर

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:19PM

बुकमार्क करा
सोलापूर : इरफान शेख

सोन्नलगी ते स्मार्ट सिटी व्हाया सोलापूर, असा उल्लेख करताना ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर महाराज यांचा इतिहास वाचल्याशिवाय किंवा अभ्यासल्याशिवाय सोन्नलगीचा अर्थ कळणार नाही. अगदी सोन्यासारखे शहर असलेल्या सोन्नलगीला बदलत्या काळात सोलापूर अशी नवी ओळख मिळाली.  सध्या सिध्दरामांची ही सोन्नलगी स्मार्ट होत आहे. रुप बदलत आहे. विणकरांचं सुधारित खेडं ग्लोबल होत आहे. अर्थात ही कृपा सिध्देश्‍वरांचीच. 
 समतेच्या चळवळीचे दीपस्तंभ सिद्धेश्‍वर

सोन्नलगीमध्ये मुद्दगौडा व सुग्गलादेवी हे दाम्पत्य राहत होते.हे दाम्पत्य खूप वृध्द होते. 1125 ते 1130 दरम्यान महाशिवयोगी श्री रेवणसिध्देश्‍वर यांनी मंगळवेढा व माचणूर होत सोन्नलगीमध्ये प्रवेश केला. सोन्नलगीमध्ये प्रवेश करताच त्यांनी साष्टांग नमस्कार केला. रेवणसिध्देश्‍वर महाराजांनी भविष्यवाणी केली की, या सोन्नलगीमध्ये एक मोठा शिवयोगी जन्मास येणार आहे व भविष्यवाणीप्रमाणे वृध्द दाम्पत्य मुद्दगौडा व सुग्गलादेवी यांच्या पोटी श्री सिध्देश्‍वर महाराजांनी जन्म घेतला. एका कथेनुसार सुग्गलादेवींना गरोदराच्या पाचव्या महिन्यातच सिध्दरामेश्‍वरांनी जन्म घेतला. पुढे सिध्देश्‍वरांनी दक्षिण भारतीय समतेच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. 

 मंदिराने बनवले समाजसेवेचे केंद्र

पुढे काही वर्षांनी सिध्दरामेश्‍वरांनी    सोन्नलगीमध्ये 68 लिंग व 17 मंदिरांची स्थापना केली. शिवलिंग स्थापनेनंतर सिध्दरामेश्‍वरांनी गरीब, अनाथ व पीडित जनतेवर आपले लक्ष केंद्रीत करुन बारमाही अन्नछत्र योजना आणली. त्यानंतर सिध्दरामेश्‍वरांनी सोन्नलगीमध्ये आपल्या अनुयायांसह तलावाची उभारणी केली. ज्याचा सिध्देश्‍वर तलाव म्हणून अनेक जण उल्लेख करतात.

 कुंभार कन्येची कथा

कुंभार कन्येने सिध्दरामेश्‍वरांशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांनी त्यांच्या योगदंडाशी विवाह करण्याची परवानगी दिली. त्या विवाह सोहळ्याची स्मृती म्हणून प्रतिवर्षी मकरसंक्रातीच्या काळात हा विवाह होतो. नंदीध्वज हे श्री सिध्दरामेश्‍वर यांच्या योगदंडाचे प्रतिक आहे.

सिध्दरामेश्‍वर जसे योगी होते, त्याप्रमाणे कवि देखील होते. त्यांनी कन्नड भाषेत अमर्याद साहित्य निर्मिती केली आहे. आपले जीवनकार्य संपन्न झाल्यावर त्यांनी स्वत: निर्माण केलेल्या तलावाच्या मध्यभागी समाधी घेतली.

 स्वातंत्र्य वेदीवर चार हुतात्म्यांचे प्राणार्पण

त्यानंतर सोन्नलगी शहरावर अनेक राजामहाराजांनी राज्य केले. यादवांच्या काळात या शहराला सोन्नलगी असे म्हटले जात होते, तर मुघलांच्या काळात संदलपूर असे नाव होते. ब्रिटीश काळात सोन्नलगीचे सोलापुरात रुपांतर झाले. ब्रिटीश काळात तर सोलापुरातील तरुणांनी हिरहिरीने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यलढ्यात शंकर शिवदारे हा सोलापुरचा प्रथम हुतात्मा होता. 1930 मधील मे महिन्याच्या 9,10,11 या तीन दिवसांत सोलापूरकरांनी ब्रिटीशांना हाकलून लावले होते. याच वेळी ब्रिटीशांनी तब्बल 49 दिवस मार्शल लॉ पुकारला होता. ब्रिटीश काळात सोन्नलगी किंवा सोलापुरातील कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, मल्लप्पा धनशेट्टी यांना 12 जानेवारी 1931 ला फासावर लटकवले होते. म्हणून सोन्नलगीला हुतात्म्यांचे शहर देखील म्हटले जाते.

 विणकरांची, कष्टकर्‍यांची नगरी

स्वातंत्र्यानंतर सोलापूरचे महत्त्व आणखीन वाढले. हातमाग उद्योग व यंत्रमाग उद्योग झपाट्याने वाढले.विडी उद्योगाने देखील आपली पकड मजबूत केली. धार्मिक व अध्यात्मिक बाबतीत सोलापूर महाराष्ट्रात विशेष महत्त्वपूर्ण आहे. दक्षिण भारतातील काशी असलेल्या पंढरपूरात आषाढी व कार्तिकी यात्रेसाठी लाखो भाविक सोलापूर जिल्ह्यात दाखल होतात.

आज सोलापूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, कारण एका शहरासाठी एक विद्यापीठ ही संकल्पना भारतात फक्त सोलापुरात आहे. 2016 मध्ये सोलापूरला  स्मार्ट शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. 2025 पर्यंत सोलापूर शहराला स्मार्ट सिटीत बदलण्यात येणार आहे. 2921 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च प्रस्तावित ठेवला आहे आणि अगदी अलीकडच्या काळाचा विचार केला असता सोन्नलगीचे आता व्हाया सोलापूरहून स्मार्ट सिटीमध्ये बदल होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रंगभवन चौक ते हरिभाई देवकरण प्रशाला दरम्यान असलेल्या मार्गाला स्मार्ट रुप देण्यात येत आहे.श्री सिध्देश्‍वर महाराजांच्या होम मैदानालाच लागून सोन्नलगी स्मार्ट सिटीचे रुप घेत आहे.