Mon, Aug 26, 2019 13:08होमपेज › Solapur › शेतकर्‍यांना मतदान अधिकार मिळवून दिला याचे समाधान : सुभाष देशमुख

'शेतकर्‍यांना मतदान अधिकार मिळवून दिला याचे समाधान'

Published On: Dec 26 2017 1:35AM | Last Updated: Dec 25 2017 10:50PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी  

सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या जीवावर उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांमध्ये संचालक निवडीचे अधिकार सर्वसामान्य शेतकर्‍यांनाच मिळावेत यासाठी प्रयत्न करून हे विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर करून घेतले. त्यामुळे बाजार समित्यांचे कारभारी ठरविण्याचा अधिकार शेतकर्‍यांना मिळवून दिला याचे मोठे समाधान वाटत असल्याचे राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

ना. सुभाष देशमुख यांनी संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. शेतकर्‍यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या बाजार समित्यांमध्ये संचालकच मोठे झाले, तर या संस्थांचे प्रतिनिधीत्व निवडण्याचे अधिकार मोजक्या लोकांच्याच हाती गेल्याने वर्षानुवर्षे तेच ते पदाधिकारी निवडले जात होते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी यापासून वंचित राहिले होते. यासाठी सर्वसामान्य शेतकर्‍यांना बाजार समित्यांमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आपण हे विधेयक आणले आणि त्या विधेयकाला आता दोन्ही सभागृहांत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या संस्थांचा मालक आता खर्‍याअर्थाने शेतकरी झाला असून त्याचे समाधान आपल्याला मिळाले असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले.

राज्यातील काही बाजार समित्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे त्या निवडणुका घेऊ शकतील. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांनी काय करायचे, असा प्रश्‍न विरोधकांनी उपस्थित केला होता. याचाही विचार केला असून त्यांना पणन विभागाच्यावतीने काहीअंशी मदत करण्यात येणार आहे. या बाजार समित्या सक्षम व्हाव्यात यासाठी शेतकर्‍यांनी माल बाजार समित्यांमध्येच विकावा यासाठी आग्रह धरण्यात येणार असल्याचे  देशमुख यांनी सांगितले.शेतमाल तारण योजनेला कमी प्रतिसाद मिळत असल्याची खंत ना.देशमुख यांनी व्यक्त केली.