होमपेज › Solapur › ‘स्मार्ट सिटी’च्या सोलरचा पडेना उजेड

‘स्मार्ट सिटी’च्या सोलरचा पडेना उजेड

Published On: Aug 28 2018 1:46AM | Last Updated: Aug 27 2018 10:18PMसोलापूर : प्रतिनिधी 

‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत सोलापूरचे लूक बदलणार, अशी चर्चा वारंवार ऐकायला मिळत आहेत. त्यासाठी कोट्यवधींचा निधीसुध्दा आला असून त्याची कामेही सुरू झाल्याचे दिसतात. मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत होणारा सौरऊर्जेवर वीज तयार करण्याचा प्रोजेक्ट रखडला आहे.

 स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सोलापुरातील 65 कार्यालयांमध्ये सौरऊर्जेवर वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर महानगरपालिका, कौन्सिल हॉल, हुतात्मा स्मृती मंदिर यासह जिल्हाधिकारी कार्यालय, डाक बंगला, विक्रीकर भवन,  शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदींचा समावेश आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून सोलापूर महागरपालिकेच्या इमारतीवर सोलर पॅनल बसविण्याचे काम सुरू झाले. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यावरून महापालिकेच्या आवारात सोलर पॅनल आले. त्यावेळी 15 ऑगस्टपर्यंत हे कामकाज होणार, अशी माहिती स्मार्ट सिटी आणि आयुक्‍त कार्यालयातून देण्यात आली होती.  मात्र 15 ऑगस्टपर्यंत पॅनल बसविण्याचे कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्यामुळे वीजनिर्मिती झालीच नाही.  

या आठवड्यात सोलर पॅनल बसविण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे जनरेटर बसविण्याचे काम सुरु आहे.  त्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी किमान आणखी दोन-चार दिवस लागणार, अशी माहिती सूत्रांनी दिली असून सप्टेंबरमध्येच वीज तयार होण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेतील कौन्सिल हॉलसाठी 50 किलोवॅट, हुतात्मा स्मृती मंदिरसाठी 50 किलोवॅट आणि प्रशासकीय इमारतीसाठी 50 किलोवॅट अशी 150 किलोवॅट इतकी वीज या टप्प्यात निर्माण केली जाणार आहे. या तीनही इमारतींच्या विजेची गरजही 150 वॅट इतकी आहे. 

मात्र पावसाळ्यात कमी, तर उन्हाळ्यात ती वाढते. त्यामुळे वीज महामंडळाकडून कधी वीज घेतली जाणार आहे, तर कधी सोलरव्दारे तयार झालेली वीज  वीज मंडळाला देण्यात येणार आहे. वीज मंडळाला दिलेल्या विजेचे थेट पैसे महापालिकेला मिळणार नसले तरी वीज मंडळाकडून जेव्हा परत महापालिकेली वीज देण्यात येईल तेव्हा त्यातून विकलेल्या विजेचे बिल वळते करून घेण्यात येणार आहेत.साडेसात कोटींचा प्रोजेक्ट शासकीय इमारतींसाठी सौरऊर्जेद्वारे वीज तयार करण्याचा हा प्रकल्प सुमारे साडेसात कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पाचे काम पुण्यातील व्होल्टेज इंफ्रा प्रयाव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून वीजनिर्मितीची संपूर्ण रचना तयार केल्यावर त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात येणार आहे. महापालिकेतील पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर इतर शासकीय कार्यालयांत काम सुरू होणार आहे. मात्र अद्याप अनके कार्यालयांकडून ना-हरकत प्रमाणपत्रेही आलेली नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.