होमपेज › Solapur › महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यात होणार सोलापूरचे ब्रँडिंग

महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यात होणार सोलापूरचे ब्रँडिंग

Published On: Sep 08 2018 8:41PM | Last Updated: Sep 08 2018 8:41PMसोलापूर : प्रतिनिधी 

पुण्यासह जगभरात सोलापुरातील पर्यटन, धार्मिक, कृषी, आरोग्य सेवा, शिक्षणसेवा आणि उद्योग अशा विविध गोष्टींचे ब्रँडिंग व्हावे यासाठी  पुण्यातील साखर संकुलामध्ये ‘सोलापूर महोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात येणार आहे.  याबाबतची माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमूख यांनी  दिली.

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यात १५, १६, १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुण्यातील उद्योजक भूषण कुलकर्णी, रवींद्र मिनीयार, बॉबी मेनन, ओ.एस. डी. संतोष पाटील, सोलापूर सोशल फौंडेशनच्या सल्लागार प्रा. देवानंद चीलवंत, प्रा. नरेंद्र का, मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले, जनसंपर्क अधिकारी श्रीकांत माळगे आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील विविध उत्पादने, कला, कलाकार, साहित्यिक यांना संपूर्ण भारतभर बाजारपेठ आणि ओळख निर्माण करणे, जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रे , पर्यटनस्थळे यांना देशभर व्यापक प्रसिद्धी देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असून त्यासाठी सोलापूरातील यशस्वी लोकांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

या सोलापूर महोत्सवात विविध उत्पादनापासून ते पर्यटन स्थळे, खाद्य पदार्थ यांचे  १०० पेक्षा जास्त दालने असतील. दोन स्वतंत्र कला दालने असून त्यात सोलापूरची महती सांगणारी दालनेही असणार आहेत.  दर्जेदार कृषी उत्पादने, कापड उत्पादने, औद्योगिक उत्पादने, चवदार खाद्य पदार्थ, विविध प्रकारच्या कला, कलावंत, विविध तीर्थक्षेत्रे तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे, आदीचा समावेश असणार आहे. महोत्सव कालावधीत पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देतील यासाठी नियोजन चालू असून .  सुमारे १०,००० सोलापूरकरांना व्यक्तिशः निमंत्रण देण्यात येणार आहे.