Thu, Jul 18, 2019 17:22



होमपेज › Solapur › सोलापूरच्या बालाजी भक्‍ताचा तिरुपतीवारीचा विक्रम

सोलापूरच्या बालाजी भक्‍ताचा तिरुपतीवारीचा विक्रम

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 9:58PM



सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

देशातील कोट्यवधी भाविकांचे इष्टदैवत असलेल्या तिरुमला-तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्‍वर अर्थात बालाजी दर्शनाला एक, दोन नव्हे तर तब्बल 175 वेळा जाण्याचा विक्रम सोलापूरच्या एका बालाजी भक्ताने केला आहे. या संकल्पपूर्तीबद्दल त्याने 3 व 4 जून रोजी श्रीवारी अखंड महायज्ञयागाचे आयोजन केले आहे. 

बालाजी दासरी असे या अवलिया भक्ताचे नाव. नावातच ‘बालाजी’ असलेला हा भक्त तसा सर्वसामान्य भक्तांप्रमाणे होता. मात्र सन 2006 मध्ये त्याच्याबाबत एक अशी घटना घडली की तेव्हापासून त्याने ‘श्रीं’च्या सेवेचा अखंड वसा घेतला. आपल्या एक वर्षाची मुलगी सुप्रिया हिचे जावळ काढण्यासाठी तो कुटुंबियांसमवेत तिरुमलाला गेला होता. तिथे त्यावेळी प्रचंड पाऊस होता. राहण्यासाठी रुमचीही व्यवस्था झाली नाही. पदपथावर राहण्याची वेळ आली. अशातच मुलीला फणफणून ताप आला. 

आजारी मुलीला त्याने खाली तिरुपतीला आणून एका दवाखान्यात दाखल केले. तेव्हाच त्याने अशी दुर्दैवी वेळ दुसर्‍या कोणा भक्तावर येऊ नये, असे साकडे देवाला घातले. एवढेच नव्हे तर त्याने बालाजी मंदिरात जाऊन ‘श्रीं’च्या सेवेला अखंडपणे वाहून घेण्याचा संकल्पही केला. देवाच्या कृपेने मुलगी बरी झाली अन् त्याला देवाचा एकप्रकारे साक्षात्कार झाला. 

या साक्षात्कारानंतर बालाजी दासरी याने भक्तांना मोफत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.  तिरुमला तिरुपती देवस्थानचे (टीटीडी) सारखे बदललेले नियम, तेथील विविध सोयीसुविधा आदींविषयीची माहिती तो भक्तांना देतो. साक्षात्कारानंतर बालाजीच्या तिरुपतीवारीत वाढ होत गेली. 

तिरुपतीला 101 वेळा जाण्याचा संकल्प त्याने केला. महिन्यातून किमान तीन-चार वेळा त्याची हमखास वारी ठरलेली असते. सन 2015 मध्ये हा संकल्प त्याने पूर्ण केला. यानिमित्त त्याने बालाजी भक्तांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम संत तुकाराम चौकानजिकच्या आपल्या निवासस्थानाजवळ घेतला. यावेळी तिरुमलाच्या धर्तीवर वैकुंठद्वार दर्शनाची सोयही त्याने केली होती. 

101 वेळा तिरुपतीला जाण्याच्या संकल्पपूर्तीनंतर त्याने 175 वेळा जाण्याचा नवीन संकल्प केला. त्याची पूर्तीही नुकतीच झाल्याने बालाजीने पुरुषोत्तम (अधिक) मासाचे औचित्य साधून आपल्या घराजवळ श्रीवारी अखंड महायज्ञयागाचे आयोजन 3 व 4 जून रोजी केले आहे. याकरिता तात्पुरते बालाजीचे मंदिरही उभारले आहे. 

या दोन दिवसांत सुमारे 10 हजार भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. तब्बल 175 वेळा तिरुपतीला जाण्याचा आगळावेगळा विक्रम करणार्‍या या बालाजीने महायज्ञयाग कार्यक्रमात भक्तांना मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे.