पेट्रोलसाठी सोलापूरकरांची धडपड

Last Updated: Mar 26 2020 9:03PM
Responsive image
सोलापूर : पेट्रोल पंप बंद करण्याचे आदेश निघाल्यानंतर गुरूवारी शहरातील पेट्रोल पंपावर दुचाकीस्वारांनी पेट्रोलसाठी अशी गर्दी केली होती.


सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही विनाकारण गर्दी होत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही सोलापूरकर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गुरुवारी धडपड करताना दिसून आले. दिसला पंप की कर फुल्‍ल टाकी, अशीच अवस्था हव्यासापोटी नागरिकांची दिसून येत होती. 

कोरोनाचा प्रसार गर्दीतून होण्याचा धोका सर्वाधिक हानिकारक असल्याने प्रशासनाकडून गर्दीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, तरीही काही नागरिकांकडून विनाकारण गर्दी होत असल्याचे दिसून येत असल्याने प्रशासनाने सर्वसामान्यांकरिता पेट्रोल व डिझेल विक्री बंदीचे आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सुविधा देणार्‍या वाहनांना पेट्रोल व डिझेल देण्याच्या सूचना पंपचालकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल पंप सुरू आहेत. यात सर्वसामान्य नागरिकांचीही पंपावर दुचाकीची घुसखोरी होत असल्याचे दिसून येत आहे. 14 एप्रिलपर्यंत कदाचित आपल्याला पेट्रोल मिळणार नाही या भीतीपोटी अनेक दुचाकीस्वार  दिसला पंप की कर टाकी फुल्‍ल, अशी भूमिका घेत असताना दिसून येत होते. पेट्रोल विक्री बंदीचे आदेश निघाल्यानंतर सकाळपासून पंपांवर दुचाकीस्वारांची गर्दी वाढल्याने अनेक पंपांवर शेवटी पोलिसांना थांबवून अत्यावश्यक सेवा देणार्‍या वाहनांकरिताच पेट्रोल देण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसून येत होते. काही दुचाकीस्वार पेट्रोल आणण्याची जबाबदारी अत्यावश्यक सुविधा देणार्‍या वाहनधारकांवर सोपवित असल्याचेही दिसून येत आहे. पेट्रोल आणल्यानंतर टाकीतून काढून पेट्रोलची भागादीर करण्याचा प्रकारही सुरू असल्याचे दिसून येत आहे.