Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Solapur › जिल्हा परिषदेत स्मार्टफोनचा होतोय खुळखुळा

जिल्हा परिषदेत स्मार्टफोनचा होतोय खुळखुळा

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 11 2017 8:56PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

दहा हजार शिक्षक, सुमारे 20 हजार जि.प. कर्मचारी यांच्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या हिताच्या योजना राबविणारी मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणार्‍या जिल्हा परिषदेत कोणत्याच मोबाईलला नेटवर्क येत नसल्याने स्मार्टफोनचा खुळखुळा झाल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार गत काही महिन्यांपासून सुरु असून नेटवर्कच येत नसल्याने याठिकाणी बोंबाबोंब सुरु झाली आहे. 

जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर जि.प. पदाधिकार्‍यांची दालने आहेत. तळमजल्यावर प्रशासकीय अधिकार्‍यांची प्रमुख कार्यालये आहेत. तिसर्‍या मजल्यावरही अत्यंत कॉर्पोरेट पध्दतीने उभारण्यात आलेली कार्यालये आहेत. मात्र या तीनही मजल्यावर कोणत्याही मोबाईलला व्यवस्थित रेंजच येत नसल्याने जिल्हा परिषदेतील संपर्क संपर्काबाहेर गेला आहे. 

जि.प. पदाधिकार्‍यांना भेटण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक येतात. मात्र पदाधिकार्‍यांचे लोकेशन घेण्यासाठी नागरिकांनी मोबाईलवर फोन केल्यानंतरच फोनच लागत नसल्याचे दिसते. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मोबाईलबाबतीतही तसेच आहे. कार्यालयात असतानाही संपर्क होत नसल्याने पदाधिकारी व अधिकार्‍यांबाबतीत काही वेळेस गैरसमज पसरत आहे. 

जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी याप्रकरणी लक्ष घालून संबंधित मोबाईल कंपनीच्या अधिकार्‍यांना नेटवर्क उभारुन देण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर काही मोबाईल कंपनीच्या अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेत येऊन याबाबत पाहणी व तपासणी करुन गेले होते. त्यानंतर मात्र परिस्थितीत पुन्हा ‘जैसे थे’ अशीच राहिली आहे. 

जि.प. पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या दालनात लँडलाईन फोनची सुविधा आहे. त्यामुळे प्रशासन व पदाधिकार्‍यांतर्गत संवाद होण्याचा एक मार्ग आहे. मात्र मोबाईलवरुन अन्य ठिकाणी संवाद साधणे कठीण होत आहे. त्यामुळे कामेही थांबतात.

जि.प. प्रशासनाने काळाची गरज ओळखून मोबाईल कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून जिल्हा परिषदेत स्वतंत्र मोबाईल टॉवर उभारुन सर्वच मोबाईलधारकांना व्यवस्थित नेटवर्क उभारुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.