Mon, Jul 22, 2019 02:54होमपेज › Solapur › होटगीश्‍वरांच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

होटगीश्‍वरांच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 9:10PM

बुकमार्क करा

सोलापूर ः प्रतिनिधी

होटगी मठाचे मठाधिकारी लिंगैक्य योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी सोलापुरात शुक्रवारी लाखो भाविकांचा महापूर दिसून आला. ‘ओम नम: शिवाय’च्या गजरात यावेळी हजारो महिला भक्तांनी  शिवभजन करीत बाळी वेसपासून ते होटगीपर्यंतच्या वीस किलोमीटरचे अंतर पायी चालून होटगीश्‍वरांचा अखेरचा निरोप घेतला. होटगी मठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्यासह अन्य शिवाचार्य गणांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता बाळी वेस येथून लिंगैक्य योगीराजेंद्र महास्वामी यांची अंतिम दर्शन यात्रा निघाली. गुरुवार रात्रीपासून ते शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत बाळी वेस येथील मठात होटगीश्‍वरांचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले.

यानंतर निघालेल्या अंतिम दर्शन यात्रेतही लाखो भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी हळदे बँड, हलगी, भजनी मंडळ, ढोल पथक आदी वाद्यांचा ताल घुमत होता. बाळी वेस येथे निघालेल्या यात्रेत सुरुवातीपासून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, श्रीशैल बनशेट्टी, राजशेखर शिवदारे, विश्‍वनाथ चाकोते आदींसह समाजातील लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. 

मधला मारुती परिसरात व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून होटगीश्‍वरांना हार अर्पण करून श्रध्दाजंली वाहिली. यावेळी नंदीध्वजाच्या आगमनाप्रसंगी जशी सुरेख रांगोळी काढण्यात येते तशीच सुबक रांगोळी व रस्त्यावर सर्वत्र फुलांचे आच्छादन करण्यात आले होते. यावेळी विविध सामाजिक संस्था, व्यक्ती व व्यापारी संघटनेच्यावतीने अंतिम यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना पिण्याचे पाणी व प्रसाद वाटप केला. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मराठवाडा, कर्नाटक आदी भागांतून आलेल्या भाविकांची संख्या यावेळी दिसून आली. ग्रामीण भागातील खासगी वाहनांतून भक्तांचा ओघ दुपारी तीन वाजेपर्यंत शहरात सुरुच असल्याचे चित्र दिसून येत होते. 

बाळी वेस येथून निघालेल्या मिरवणुकीदरम्यान असलेल्या सिद्धेेश्‍वरांनी स्थापन केलेल्या लिंगाभोवती भाविकांनी भजन करून महाराजांना अभिवादन केले. होटगी मठाच्या अधिपत्याखाली चालणार्‍या सर्व शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक व अन्य कर्मचारीवर्ग महाराजांच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मधला मारुती, माणिक चौक, रंगभवन, सात रस्ता, होटगी रोड आदी भागांत होटगीश्‍वरांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला भाविकांचा महापूर लोटला होता. हार अर्पण करून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या भाविकांनी होटगीश्‍वरांचे अंतिम दर्शन घेतले.