Sun, Apr 21, 2019 06:37होमपेज › Solapur › विकास राठोडचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला

विकास राठोडचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 8:54PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

हातभट्टीवर  कारवाईसाठी  गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकावर खुनी हल्ला करणार्‍याचा अटकपूर्व जामीनअर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी फेटाळून लावला. विकी ऊर्फ विकास धानू राठोड (वय 22, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) असे अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नागेश मात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 एप्रिल 2017 रोजी कुमार स्वामीनगर येथे अवैध हातभट्टी दारू वाहतूक करणार्‍या पिंटू राठोड व करण जाधव यांच्यावर कारवाई करताना पोलिस उपनिरीक्षक मात्रे यांनी दोघांचा पाठलाग केला. त्यावेळी चाकोते पेट्रोल पंपासमोर  मात्रे यांच्या मोटारसायकलला दोघांनी जोरदार धडक दिली. त्यामध्ये  मात्रे जखमी झाले. त्यानंतर हैदराबाद महामार्गावर विकी राठोड व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर दगडफेक केली म्हणून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून राठोड याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश उगले यांनी राठोडचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी, तर आरोपीकडून अ‍ॅड. एस. एन. झुरळे यांनी काम पाहिले.