होमपेज › Solapur › बोगस डॉक्टरांवर संयुक्‍तरीत्या कारवाई करा : जिल्हाधिकारी

बोगस डॉक्टरांवर संयुक्‍तरीत्या कारवाई करा : जिल्हाधिकारी

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:45PMसोलापूर : प्रतिनिधी

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध पोलिस, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि महानगरपालिका यांनी एकत्रित येऊन कारवाई करावी, अशा सूचना आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.

बनावट वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी सांगितले की, बनावट वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात एकसूत्रीपणा हवा आहे. विविध विभागांनी एकत्रित येऊन कारवाई केल्यास कारवाईला ठोस रूप येईल. त्यामुळे सर्व विभागांनी एकत्रित येऊन कारवाई करावी. पोलिसांनी बनावट वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे नोंदवावेत.

यावेळी डॉ. भोसले यांनी पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीबाबतही पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एम. डी. पॅथॉलॉजी अथवा मान्यताप्राप्त शिक्षण असलेल्या व्यक्‍तींनाच पॅथॉलॉजी टेस्ट करता येतात. त्यामुळे अवैधरीत्या चाचणी करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करावी, असे भोसले यांनी सांगितले. यावेळी पॅथॉलॉजी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. आशा कुमठेकर, डॉ. भारत मुळ्ये, डॉ. नीलकंठ पोतदार यांनी आपली बाजू मांडली. कुमठेकर म्हणाल्या की, खासगीरीत्या तपासणी करायला बंदी घालण्यात आली आहे; मात्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चाचणी करण्यास परवानगी आहे. शहरात याचे पालन होत नाही. यावेळी अवयवदान चळवळीबाबतही चर्चा झाली. जिल्हा अवयवदान समन्वय अधिकारी डॉ. विलास सरवदे यांनी याबाबत माहिती दिली.