Sat, Apr 04, 2020 17:57होमपेज › Solapur › सोलापूरला ११० दशलक्ष लिटर दररोज पाणीपुरवठा

सोलापूरला ११० दशलक्ष लिटर दररोज पाणीपुरवठा

Last Updated: Feb 19 2020 1:16AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सोलापूर शहराला उजनी धरणातून केल्या जाणार्‍या पाणीपुरवठा योजनेसाठी 110 किलोमीटर जागेचे सीमांकन येत्या 15 दिवसांत पूर्ण करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिका आयुक्‍त, तसेच जिल्हाधिकार्‍यांसह संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे सांगताना पंप हाऊस व जॅकवेल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने ‘उजनी’ जलाशयाजवळ 0.25 हेक्टर जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यावी, तसेच जमिनीचे सीमांकन पूर्ण झाल्यानंतर तातडीने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले.उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करताना अनेक ठिकाणी पाईपलाईन शेतजमिनीखालून जाणार असल्याने शेतकर्‍यांना नियमानुसार भरपाई देऊनच हे काम करावे, असे पवार यांनी सांगितले.

सोलापूर शहराची ही पाणीपुरवठा योजना दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर शहरासाठी उजनी ते सोलापूर समांतर 110 दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी टाकून दुसर्‍या टप्प्यात सोलापूर शहरासाठी वितरण व्यवस्था सुधारली जाईल. 464 कोटी रुपयांच्या या योजनेद्वारे सोलापूर शहराला दररोज 110 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार असल्याने शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्‍त दीपक तावरे उपस्थित होते.