Thu, Jan 17, 2019 19:34होमपेज › Solapur › तर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : खा. शेट्टी

तर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : खा. शेट्टी

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 11:22PM

बुकमार्क करा

 सोलापूर ः महेश पांढरे

सोलापूर जिल्ह्यातील काही मोजके साखर कारखाने सोडले तर उर्वरित एकाही कारखान्याने उसाचा दर जाहीर केलेला नाही तसेच एफआरपीप्रमाणे पहिला हप्ताही शेतकर्‍यांच्या नावावर जमा केलेला नाही. त्यामुळे अशा साखर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसंदर्भात लवकरच आमचे शिष्टमंडळ साखर आयुक्तांना भेटणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिली. 

नोव्हेबर, डिसेंबरमध्ये ऊसदराचे आंदोलन चांगलेच पेटले होते. यावर सर्वपक्षीय शेतकरी संघटना आणि कारखानदारांनी एफआरपी अधिक दोनशे रुपयांचा  फार्म्युला मान्य केला होता. त्यामुळे या आंदोलनावर पडदा पडला होता. मात्र त्यांनतर साखर कारखानदारांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून यावर कोणीच बोलायला तयार नाही. काही कारखानदार सोडले तर उर्वरित कारखानदारांनी एफआरपीनुसारही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाला नेमका किती भाव मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असली तरी कारखानदारांनी मात्र यावर मूग गिळून गप्प राहण्याची भूमिका घेतली आहे.

दुसरीकडे शेतकरी संघटनाही गायब झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या बिलाचे आणि अंतिम हप्त्याचे काय होणार यासाठी शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे येत्या जानेवारीपासून आता आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनीही आता आपली भूमिका स्पष्ट केली असून अशा साखर कारखानदारांनी तात्काळ शेतकर्‍यांच्या उसाचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करावा अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात साखर आयुक्तांची भेट घेण्यासाठी स्वाभिमानीचे शिष्टमंडळ पाठविणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कारखानदारांनी जर आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर पुन्हा ऊसदाराचे आंदोलन सोलापुरात चिघळेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.