Fri, May 24, 2019 06:39होमपेज › Solapur › लाखोंच्या उपस्थितीत अक्षता सोहळा

लाखोंच्या उपस्थितीत अक्षता सोहळा

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 9:11PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाहसोहळा लाखोंच्या उपस्थितीमध्ये पार पडला. सुगडी पूजन, गंगा पूजनानंतर संमती वाचन झाले. ‘सत्यम्... सत्यम्... दिड्डम्...दिड्डम्...’, ‘बोला... बोला... एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ’, ‘श्री सिद्धेश्‍वर महाराज की जय’च्या जयघोषात अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी राज्यातील, परराज्यांतील लाखो भक्तगण अक्षता सोहळ्यात सहभागी झाले होते.  68   लिंगांना   नंदीध्वज   मिरवणुकीने शुक्रवारी दिवसभर तैलाभिषेक करण्यात आले.?शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सात नंदीध्वज काठ्या मिरवणूक मार्गाने अक्षता सोहळ्यासाठी निघाल्या होत्या. दुपारी 2.45 च्या सुमारास या मानाच्या सातही काठ्या सिद्धेश्‍वर मंदिर येथील संमती कठ्ठ्यावर दाखल झाल्या.

दुपारी नंदीध्वजांचे आगमन झाल्यावर सुगडी पूजन, गंगा पूजन करण्यात आले. सिद्धरामेश्‍वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने सुगडी पूजा राजशेखर हिरेहब्बू व देशमुख परिवाराच्या हस्ते करण्यात आली. शेटे, हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर अक्षता सोहळ्यासाठी मंगलाष्टके म्हणण्यात आली. तम्मा शेटे यांनी संमती वाचन केले. श्री सिद्धरामेश्‍वरांच्या नयनरम्य अशा या अक्षता सोहळ्यासाठी आबालवृद्धांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसरातील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते.  या सर्व धार्मिक विधींची अद्ययावत माहिती बसवराज शास्त्री हिरमेठ यांनी सातत्याने स्पिकरवरुन भाविकांपर्यंत पोहोचविली. लाखोंच्या संख्येत सिध्देश्‍वर भक्त दाखल झाले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तयार ठेवला होता. जेणेकरुन  कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कोणतीही दुर्घटना होता कामा नये यासाठी विषेश व्यवस्था करण्यात आली होती.