Mon, Jun 24, 2019 21:36होमपेज › Solapur › स्नेहभोजनाद्वारे दोन देशमुखांचे मनोमिलन

स्नेहभोजनाद्वारे दोन देशमुखांचे मनोमिलन

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 8:54PM

बुकमार्क करा
 सोलापूर :  प्रतिनिधी

गटबाजीचे राजकारण करुन गेले वर्षभर सोलापूरच्या भारतीय जनता पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आणलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री  सुभाष देशमुख या मंत्रीद्वयांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सिद्धेश्‍वर अक्षता सोहळ्याच्यानिमित्ताने स्नेहभोजन केले. याद्वारे दोन्ही गटांचे मनोमिलन झाल्याचे मानण्यात येत आहे. मनपातील वाढत्या गटबाजीची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दोन मंत्री, शहराध्यक्ष, मनपाचे पदाधिकारी तसेच पक्षाच्या सर्व नगरसेवकांना मुंबईला पाचारण करुन चांगलीच झाडाझडती घेतली होती. यापुढील काळात जबाबदारीने न वागल्यास मनपा बरखास्त करु, अशी तंबी देतानाच मुख्यमंत्र्यांनी मकर संक्रांतीचे औचित्य साधून दोन्ही गटांचे मनोमिलन करुन वादाचा शेवट गोड करा, असे बजाविले होते. यानुसार पालकमंत्री देशमुख यांनी ग्रामदैवत सिद्धेश्‍वरांच्या अक्षता सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही गटांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला खा. शरद बनसोडे, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष  प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, परिवहन समितीचे सभापती दैदिप्य वडापूरकर यांच्यासह दोन्ही गटांचे नगरसेवक, नगरसेविकांनी हजेरी लावली. याशिवाय आ. प्रशांत परिचारक, जि.प.चे अध्यक्ष संजय शिंदे, माजी आ. राजेंद्र राऊत, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांनीदेखील भोजनाचा आस्वाद घेतला. तत्पूर्वी सकाळी 11 वाजल्यापासून मनपा सभागृहनेते कार्यालयात दोन्ही गटांचे नगरसेवक जमण्यास सुरुवात झाली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सहकारमंत्री सुभाष देशमुख हे महापालिकेत आले.

त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे पदाधिकारी व नगरसेवक हे चालत सिद्धेश्‍वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. अक्षता सोहळा संपल्यावर  हे सर्वजण सारस्वत मंगल कार्यालयात आयोजित  हभोजनासाठी आले. पालकमंंत्री व सहकारमंत्री काही काळ एक त्र बसले. नंतर त्यांनी एकत्र बसून जेवणही केले. एरवी एकमेकांना शह-काटशह देणारे दोन्ही गटांचे पदाधिकारी, नगरसेवक एकमेकांशी मतभेद विसरुन गोडीगुलाबीने वागताना दिसून आले. स्थायी समितीचे सभापती कोळी यांना महापौर बनशेट्टी यांना जेवण वाढले. त्यानंतर महापौरांनी पालकमंत्र्यांसह इतरांना वाढून गटा-तटाच्या राजकारणाला तिलांजली दिल्याचे संकेत दिले.