Thu, Feb 21, 2019 03:02होमपेज › Solapur › सुशीलकुमार शिंदेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत फूट

सुशीलकुमार शिंदेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत फूट

Published On: Dec 16 2017 7:40PM | Last Updated: Dec 16 2017 8:16PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

स्वत:च्या पक्षापेक्षा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कुटुंब सदस्यांच्या उमेदवारी सोलापुरात अनेकांची घरे चालतात या शब्दांत शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांना घरचा आहेर दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी बरडे यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणूक आपणच लढवावी, असा आग्रह केला होता. यावरुन शिवसेनेसह एकंदर राजकीय गोटात खळबळ उडाली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला ‘हात’ दाखवून शिवसेनेचा ‘भगवा’ खांद्यावर घेतलेल्या महेश कोठे यांच्यामुळे शिवसेनेत नवीन व जुने कार्यकर्ते असा वाद निर्माण झाला आहे. कोठे यांना डिवचण्याच्या उद्देशाने बरडे यांनी शिंदे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीविषयी भाष्य केल्याची चर्चा आहे. यावरून बरडे-कोठे यांच्यात वाद निर्माण झालेला असतानाच यामध्ये शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी शनिवारी उडी घेतली. महापालिकेच्या आवारात काही निवडक पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी विद्यार्थीदशेपासून अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. शिवशरण पाटील यांनी शिवसेनेतर्फे लढविलेल्या विधानसभा निवडणुकीत मी कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. पण शिवसेनेतील अनेकांना स्वपक्षातील उमेदवारीपेक्षा सुशीलकुमार शिंदे किंवा या कुटुंबातील सदस्यांच्या उमेदवारीमध्ये जास्त रस आहे. या कुटुंबातील व्यक्तींच्या उमेदवारीबाबत हे लोक देवापाशी भीक मागतात. कारण त्यांची घरे शिंदे कुटुंबातील व्यक्तींच्या उमेदवारीवर चालतात या शब्दांत चव्हाण यांनी बरडे यांचे नाव व घेता तोफ डागली आहे.

आम्ही बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाशिवाय कोणाचाही आदेश आम्ही मानत नाही. मागील लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा आम्ही मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला होता. आता त्याहून अधिक मतांनी शिंदे यांना पराभूत करु, असा विश्‍वासही या वेळी चव्हाण यांनी व्यक्त केला. कोठे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेला आलेली मरगळ दूर झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.