Thu, Aug 22, 2019 03:50होमपेज › Solapur › सोलापूर : सेवानिवृत्त कृषी अधिकार्‍याची कोटीची फसवणूक

सोलापूर : सेवानिवृत्त कृषी अधिकार्‍याची कोटीची फसवणूक

Published On: Feb 22 2018 10:26PM | Last Updated: Feb 22 2018 10:25PMसोलापूर : प्रतिनिधी

विविध विमा कंपन्यांच्या बनावट विमा पॉलिसी काढून त्यांच्या हप्त्यांपोटी 1 कोटी 4 लाख 86 हजार 470 रुपये घेऊन सेवानिवृत्त कृषी अधिकार्‍याची फसवणूक करणार्‍या दिल्लीच्या 7 एजंटांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विराज मल्होत्रा (रा. पटेल फौंडेशन बिल्डिंग, शक्‍करपूर, गुडगाव, दिल्ली), सुमित रंजन आकाश बिडला, सुमित अग्रवाल, अंजली शर्मा, आरती नारंग, रिचा भटनागर व त्यांचे साथीदार (सर्व रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सेवानिवृत्त कृषी अधिकारी सखाराम यल्लप्पा केसकर (वय 64, रा. सुरवसेनगर, कुमठा नाका) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सखाराम केसकर हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहेत. सन 2011 पासून विराज मल्होत्रा, सुमित रंजन आकाश बिडला, सुमित अग्रवाल, अंजली शर्मा, आरती नारंग, रिचा भटनागर व इतर एजंटांनी केसकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून त्यांना   बिरला  सनलाईफ, श्रीराम लाईफ इन्शुरन्स, भारती एक्सा लाईफ आणि एचडीएफसी लाईफ या विमा कंपनीच्या दोन पॉलिसी व श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या तीन पॉलिसी काढण्यास सांगितले. त्यानुसार केसकर यांनी विमा कंपनीच्या सुमारे 10 पॉलिसी काढल्या व त्याच्या हप्त्यांची रक्‍कम ही गुरुनानक चौकातील पोस्ट कार्यालयातून विमा कंपनीच्या वरील एजंटांच्या खात्यावर भरली. तसेच केसकर यांच्या महाराष्ट्र बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक या बँकेच्या चेकद्वारे तसेच आरटीजीएस, एमईएफटी, डीडी आणि रोख  रकमेद्वारे एजंटांच्या खात्यांवर 1 कोटी 4 लाख 86 हजार 470 रुपये भरले. 

त्यानंतर केसकर यांना एका विमा कंपनीकडून त्यांची पॉलिसी मॅच्युअर झाल्याबाबतचे पत्र मिळाल्याने त्यांनी हैदराबाद येथील आयआरडीएशी संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचे पत्र पाठविले नसल्याचे सांगितले व त्यांच्याकडे केसकरांची पॉलिसी नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे केसकरांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत सदर बझार पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. 

हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक थेटे तपास करीत आहेत.